विठ्ठला.. कार्तिकीसाठी कोण करणार पूजा? पवार की फडणवीस?
मुंबई | ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्यातील ओळींप्रमाणे अशी वेळ प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यावर कधीतरी येतेच. महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितत तर नक्कीच. पण, आता ही वेळ चक्क पंढरपुरातील श्री विठ्ठल समितीवर देखील आली आहे. निमित्त ठरले आहे, महाराष्ट्रात तयार झालेली दोन उपमुख्यमंत्री पदं.
शासकीय नियम आणि संकेतानुसार राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा करतात. तर उपमुख्यमंत्री हे कार्तिक एकादशी निमित्त पूजा करतात. मात्र, राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याला दोन मुख्यमंत्री लाभल्याने आता कार्तिकी एकादशी पूजा कोणाच्या हस्ते करायची? हा पेच मंदिर समितीसमोर उभा ठाकला आहे.
यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली . सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत . कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नाही . या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली असली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने कोणाची नाराजी नको अशीच सध्याच्या समितीची भूमिका आहे .