साई भक्तांशी आपुलकीने वागणे सुरक्षा रक्षकांचे काम !त्यासाठी संस्थान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज!
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत साई दर्शनासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन दर्शन रांगेत साईभक्तांना ९ .१५ वा. जाण्यास संस्थानच्या सुरक्षारक्षकाने मज्जाव केल्याने साईभक्त आणि सुरक्षा रक्षक यांच्यात नुकतीच हमरी तुमरी झाली. वास्तविक त्या दर्शन रांगेत भाविकांना मध्ये जाण्याची वेळ ही ९ .३० वाजे पर्यंत आहे. त्यानंतर भाविकांना मध्ये जाण्यासाठी दर्शन रांग बंद करण्यात येते. मात्र त्या दिवशी ही दर्शनरांग पंधरा मिनिटे लवकरच
बंद करण्यात आली.असे साईभक्त बोलत होते.
हया विषयी संस्थानच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी या वेळे बाबत दुजोरा दिला. परंतु गर्दीच्या काळात रात्री दहा वाजेची आरतीला काही बाधा येऊ नये म्हणून गर्दी पाहून गेट बंद करण्यात येते. असे सांगीतले. या दोन्हीही बाजूच्या सांगितल्या गेलेल्या बाबी या जरी सत्य असल्या तरी भाविकांना या गोष्टी नीट समजून सांगणे सुरक्षारक्षकांचे काम आहे. साई भक्त हे साई दर्शनासाठी मनोभावे दूर वरून शिर्डीत येत असतात. त्यांच्याशी सौजन्य पूर्ण वागणे हे आपले कर्तव्य आहे. बाहेरच्या साई भक्तांना संस्थांनच्या सर्व काही गोष्टी माहित नसतात.
नियम माहित नसतात .दर्शनाची आस असते. त्यांना व्यवस्थित सौजन्याने समजून सांगितले तर साईभक्त ते ऐकू शकतात. मात्र अनेकदा साई भक्तांना नीटपणे सांगितले जात नाही व त्यामुळे साई भक्तांचा गैरसमज होऊन शाब्दिक चकमकी, हमरी तुमरी होते. अशीच घटना शिर्डीत त्या दिवशी घडली. मात्र हा मेसेज जगभर पसरतो. त्या दिवशी झालेल्या हमरी तुमरी वरून हा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे साईभक्त हे सुद्धा आपले दैवत म्हणून त्यांच्याशी आपुलकीने सौजन्याने बोलणे वागणे हे सुरक्षारक्षकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे.
सर्वच सुरक्षारक्षक असे नाहीत. अनेक जण साई भक्तांशी मोठ्या सौजन्याने वागतात. संस्थांनचे अधिकारी सौजन्यने वागतात. संस्थान साई भक्तांना मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. मात्र बोटावर मोजण्याइतके सुरक्षारक्षक साई भक्तांशी व्यवस्थित सौजन्याने आपुलकीने वागत नाहीत. त्यामुळे किरकोळ बाचाबाची, हमरी तुमरी अधून मधून होताना दिसते. असे होऊ नये यासाठी सर्वच संस्थान कर्मचाऱ्यांची अधून मधून कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देऊन साईभक्त व संस्थान कर्मचारी यांच्यामध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण व्हावे. शेगाव संस्थान मध्ये स्वयंसेवक जसे आपुलकीने प्रत्येक भक्तांशी वागतात त्याप्रमाणे येथे सौजन्य पूर्ण वातावरण असावे .यासाठी साई संस्थांनने ही प्रयत्न करावेत.
सुरक्षा रक्षक व संस्थान कर्मचाऱ्यांनी ही आपले कर्तव्य आहे. म्हणून तसे वागावे .साई भक्तांनीही आपण साई दर्शनाला मनोभावे आलो आहोत. याची जाण ठेवून येथे उद्धट वर्तन न करता एक आपण सर्वसामान्य भक्त आहोत. असे समजून वागले पाहिजे. अशी चर्चा आता होत आहे. व यासाठी साई संस्थान व्यवस्थापनाने ही येथे सौजन्यपूर्ण वातावरण कायम राहील. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी मागणी आता होत आहे.