साई पालखी पदयात्री वाहनांची वावी टोल नाक्यावर अडवणूक..!
पायी येणाऱ्या साई पदयात्रीच्या वाहनांची सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी टोल नाक्यावर अडवणूक !
साईभक्तांना मानसिक त्रास !
साई पालखींची वाहने टोल फ्री करावी मागणी!
शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षी शिर्डीला साई दर्शनासाठी उत्सवाच्या काळात , दिवाळी सुट्ट्यांमध्ये व इतर वेळी ही नेहमी विविध शहरातून ठिकठिकाणाहुन साईपालख्या व साई पदयात्री मोठ्या संख्येने येत असतात. या साई पालख्या व पदयात्रीबरोबर सामान ठेवण्यासाठी साई भक्तांची वाहने असतात. आतापर्यंत या पायी साई भक्तांच्या, साईपालखीच्या वाहनांकडून कधीही टोल आकारला जात नव्हता. मात्र सिन्नर तालुक्यातील वावी टोलनाक्यावर भिवंडी येथील साई पालखीच्या वाहनांना टोल आकारण्यात आल्याची तक्रार या साई पालखीतील साई भक्तांनी केली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर पायी येणाऱ्या साई पदयात्रांच्या सामानांची वाहने, साई पालखीची वाहने , आदींकडून शिर्डी कडे येणाऱ्या कोणत्याही महामार्गावर टोल घेऊ नये. अशी मागणी साई पदयात्रींकडून होत आहे.
सध्या दिवाळी पाडव्यानंतर अनेक ठिकाणाहून शिर्डीला साई दर्शनासाठी साई पालख्या, साईपदयात्री येत आहेत.साईबाबांच्या दर्शनासाठी थेट मुंबई गुजरात भिवंडी सह वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिर्डीकडे पदयात्रींची पालखी येत असताना या अगोदर कधीही पालख्यामधील वाहनांना टोलवर करा करताना अडवणूक केली जात नव्हती .केवळ भगवा झेंडा व नाव गाव व बोर्ड बघितला की, सोडून दिले जात होते.व जात आहे.पण वावी येथे भिवंडी वरून शिर्डीकडे १९ वर्षांपासून येणाऱ्या पायी दिंडीची वाहने अडवून पैशासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप भिवंडी येथील साईनाथ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते विकास गिते यांनी केला आहे.
साई पदयात्री पायी दिंडीचे आयोजन करुन शिर्डीकडे येतात. ज्या वाहनात जेवनाचे साहित्य, कपडे झोपण्याचे, कपडे ,पाणी इतर साहित्य काही वाहनात ठेवले जाते. ती वाहने अनेक टोलनाक्यावर मोफत सोडली जातात. पण वावी टोलनाक्यावर अडवणूक केली जात असुन त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असा आरोप करुन या टोलनाक्यावर शासनाने कारवाई करावी .व यापुढे साई पालख्या , साई रथ , व साई भक्तांची सामान असणारी वाहने टोलनाक्यावर अडवून त्यांच्याकडून कर वसूल करू नये .अशी मागणी साई पदयात्रेंकडून केली जात आहे.