सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराज यांची 26 व 27 डिसेंबर रोजी भव्य यात्रा!
शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराजांची यात्रा श्री दत्त जयंतीला म्हणजे 26 व 27 डिसेंबर 2023 रोजी
सावळीविहीर बुद्रुक येथे भरणार असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेनिमित्त दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री परशुराम महाराज यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ सावळीविहीर बुद्रुक यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराज हे प्राचीन व प्रसिद्ध असे देवस्थान असून येथे श्री दत्त जयंतीला दरवर्षी मोठी यात्रा भरते .यावर्षीही 26 व 27 या दोन दिवशी येथे भव्य यात्रा भरणार आहे. यात्रेनिमित्त मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी पहाटे कोपरगाव येथून भाविक तरुणांनी पायी कावडीने आणलेल्या गोदाजलाने श्रींचे अभिषेक स्नान होणार आहे. तसेच पूजा होऊन सकाळी अकरा वाजता भोजडे येथून भक्तांनी आणलेल्या मानाच्या काठीची डफाच्या तालात मिरवणूक गावातून निघणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता रुई रोडला मुलांनी हाउसफुल भरलेल्या बारा गाड्या ओढण्याचा भव्य असा कार्यक्रम भक्तांकडून होणार आहे.
व त्यानंतर व्हईकचा कार्यक्रम मंदिरासमोर होणार आहे. व भोजडेसह भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.रात्री आठ वाजता बाजार तळ येथे भव्य शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम होणार असून दिनांक 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्रसह सुदान, इस्राईल ,इथोपिया या देशांमध्ये आपल्या लावणीचा ठसा उमटवणाऱ्या प्रवीण कोरे निर्मित लावणी सम्राज्ञी शिवानी कोरे यांचा -शिवानीचा नादच खुळा- हा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असा लावण्यांचा भव्य आर्केस्ट्रा येथे ग्रामपंचायत समोर बाजारतळ पटांगणात होणार आहे. त्याचप्रमाणे 26 व 27 डिसेंबर 2023 या दोन दिवशी गावात आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त श्री परशुराम महाराज मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे.
तसेच या मंदिरावर तसेच गावातील श्री हनुमान मंदिर, श्री दत्त मंदिर व इतर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व परिसरातही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त हार प्रसाद मिठाई खेळणीची आदींची दुकाने तसेच रहाट पाळणे आदींसह विविध दुकाने येथे येणार आहेत.
या श्री परशुराम यात्रेचा, दर्शनाचा, शोभेची दारू व ऑर्केस्ट्राचा, आणि आयुष्यभर भारत कार्ड शिबिर आदी सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा .असे आवाहन सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच विविध संस्थांचे ,संघटनांचे पदाधिकारी, श्री परशुराम महाराज यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ, भाविक सावळीविहीर बुद्रुक तालुका राहता यांनी केले आहे.