सावधान.. बनावट आधारकार्ड, गोळा केलेले आधारकार्ड गावकरी गेट वर घेऊन जाल तर..संस्थान प्रशासन अलर्ट थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल..!
शिर्डीत पुन्हा एकदा भाविकांच्या फसवणुकीची खळबळजनक घटना घडली असून शिर्डी जवळील निमगाव कोऱ्हाळे येथील एका महिलेने अनोखा फंडा वापरत चक्क ओळखीच्या लोकांचे आधारकार्ड गोळा करून भाविकांना पास न काढता गावकरी गेटने गोळा केलेल्या आधारकार्डच्या माध्यमातून दर्शन घडविण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय मात्र संस्थान सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांच्या सतर्कतेमुळे ही महिला पकडली गेली व सदर गंभीर प्रकार समोर आलाय याबाबत संस्थानच्या वतीने सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांनी शिर्डी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर 0059/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420 प्रमाणे निमगाव कोऱ्हाळे येथील सोनाली पवन पोटे नामक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने भाविकांच्या फसवणुकीचा हा अनोखा फंडा पाहता शिर्डी व परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे
घडलेली हकीकत अशी की दिनांक 28/1/2024 रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास सोनाली पोटे नामक महिला आपले आधारकार्ड घेऊन गावकरी गेट येथे दर्शनासाठी आली असता सुरक्षा रक्षकाने तिचे आधारकार्ड पाहून तिला प्रवेश दिला मात्र तिच्या नंतर मागोमाग 5 भाविक गावकरी गेट ने प्रवेश करू लागले व त्यांचे आधारकार्ड तपासले असता संशय आला व सदर व्यक्तींच्या आधारकार्ड मध्ये तफावत आढळून आली त्यांना आधारकार्ड कोणी दिले याबाबत विचारले असता त्यांनी सोनाली पोटे यांनी दिल्याचे सांगितल्याने संस्थान महिला सुरक्षा रक्षकांनी सोनाली पोटे हिस ताब्यात घेत विचारपूस केली…तर तिने सांगितले की गर्दी असल्याने ह्या भाविकांना पास न काढता थेट गावकरी गेट ने सोडत पास चे पैसे त्या भाविकांकडून घेतल्याचे कबूल केल्याने संस्थान सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला फिर्याद देत याबाबत गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा भाविकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत असून आजूबाजूच्या लोकांचे आधारकार्ड गोळा करत भाविकांना गावकरी गेट ने दर्शन घडवून आणणाऱ्या महिलेच्या चलाखीबाबत मोठी चर्चा परिसरात रंगली आहे.
मात्र साईबाबा संस्थांनच्या सुरक्षा विभागाने सुद्धा आता बनावट आधारकार्ड आणि आधार कार्ड गोळा करून दर्शन घडवून आणणाऱ्या चलाख व्यक्तींच्या विरोधात मोहीम उघडली असून शिर्डी व परिसरातील परराज्यातील व्यावसायिकांनी बनावट आधारकार्ड बनवून गावकरी गेट चा वापर करून संस्थानची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून त्यांच्या विरोधात देखील कठोर पाऊले उचलत आधारकार्ड तपासणी कठोरपणे करण्याचा आदेश सुरक्षा रक्षकांना प्राप्त झाल्याचे समजते त्यामुळे आता यापुढे बनावट आधारकार्ड किंवा गोळा केलेले आधारकार्ड दिसून आल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल या भीतीने अनेकांनी त्या बाजूला न जाणेच पसंत केल्याचे दिसून येत आहे