गुरुवर्य रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार तर सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे यांना नारी-शक्ती पुरस्कार
गुरुवर्य रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार तर सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे यांना नारी-शक्ती पुरस्कार
अकोले ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने कळस बू येथील विडी कामगार व कृषी तील कार्या बद्दल सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे यांना नारी-शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती सन्मान सोहळा सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज व आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे हे होते. शिवव्याख्याते प्रदीप कदम, विभागीयध्यक्ष दशरथ चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, आनंद दिघे इंग्लिश स्कुल चे सचिव अनिल राहणे उपस्थित होते.
सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे ह्या कळस बू येथील असून विडी कामगार चळवळ व आंदोलनाच्या माध्यमातून गरिब, निराधार, विधवा महिलांच्या सबलीकरणाचे विशेष कार्य केले आहे. विडी कामगार यांचे हक्कासाठी रस्ता रोको, मोर्चा असे अनेक सविनय व कायदेशीर मार्गाने लढा दिला. वेतन वाढ, पगारी रजा, पेन्शन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलने केली यात अनेक वेळा सात सात दिवस तुरुंगवास येरवडा, विसापूर येथे भोगावा लागला.
कळस गावामध्ये एक विडी कारखाना असल्याने महिलांना काम मिळत नसे म्हणून पाच किलोमीटर पायी जाऊन विड्या बांधण्याचे काम केले. या महिलांसाठी दुसरा कारखाना गावात आणला. स्वतः या कारखान्याच्या इमारतीच्या भिंती सारून लोक वर्गणी काढून इमारत बांधली या महिलांची वणवण थांबवली. अनेक मुली, महिला यांना विडी बांधण्याचे शिकविले, अनेक महिलांचे प्रपंच उभे राहिले या महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. आदिवासी ठाकर समाजाचा वाटेकरी यांला घरकुल साठी स्वतःची जागा घरासाठी जागा बक्षीसपत्र करून दिली.
सौ. सखुबाई वाकचौरे यांनी विडी बांधण्याचे काम बंद केल्यानंतर आपले कोरडवाहू शेती चे बागायती शेतीत रूपांतर करून गोपालन व दुग्ध व्यवसाय सुरु केला. जिल्हा परिषद नगर च्या वतीने कृषी अन पशुपालन यातील योगदाना बद्दल प्रगतशील शेतकरी पुरस्कार, महाराष्ट्र शासन व महिला बालकल्याण विभाग च्या वतीने महिला सबलीकरण च्या कार्याबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.