शिर्डी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ ठरतोय राज्यासाठी मार्गदर्शक
शिर्डी, दि. ७ एप्रिल (उमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करावेत. निवडणूक प्रक्रिया बिनचूक पार पाडावी. असा सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज येथे दिल्या.
शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या वतीने राहाता येथील कुंदन लॉन्स येथे आयोजित निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राच्या प्रथम सत्राच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते.
मतदानाची कार्यपद्धती सांगून अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर म्हणाले की, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तिका याचे अवलोकन करून कामकाज पहावे. मतदान प्रक्रिया राबविताना काही अडचणी असल्यास वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मॉक पोल घेतला नाही म्हणजे त्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली, असे म्हणता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल घेणे कदापी विसरू नये. अशा स्पष्ट शब्दात निवडणूक प्रक्रियेविषयी श्री.कोळेकर यांनी उपयुक्त सूचना दिल्या.
प्रांताधिकारी श्री. आहेर म्हणाले, निवडणूक हा लोकशाहीचा सोहळा आहे. या कामामध्ये न्यूनगंड न बाळगता प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हावे. सर्वांनी मतदान प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दिवसभरातील दोन सत्रात बाराशे अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
सकाळ व दुपार असा सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात १२०० अधिकारी – कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
शिर्डी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ ठरतोय राज्यासाठी मार्गदर्शक
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व त्यांच्या सहकार्यानी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांची अतिशय सूक्ष्म माहिती देणारा व्हिडिओ बनविला आहे. राज्यातील निवडणूक प्रशिक्षणासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे.
तीन दिवसांपूर्वी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचा बनविलेला व्हिडिओ राज्यातील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत २० हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तासागणिक या व्हिडिओंच्या व्ह्यू मध्ये वाढ होत आहे. आरओ शिर्डी (RO Shirdi) या युट्यूब चॅनेलवर https://youtu.be/RwU6HLBFteo?si=xhg_M5Djhw9Mvp2p या लिंकवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे. निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरत आहे.