व्यक्ती, संस्थांना माध्यमांमध्ये जाहिरात देताना मतदार जनजागृतीसाठी आवाहन
अहमदनगर दि. ४ मे:- येत्या ५ मे ते १३ मे पर्यंत विविध प्रकारचे सण ,जयंती, उत्सव ,पुण्यतिथी तसेच अक्षयतृतीया,जागतिक मातृदिन यासारखे महत्त्वाचे व प्रेरणादायी उत्सव आहेत.हे औचित्य साधून अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा स्वीप समितीने व्यक्ती, संस्थांना माध्यमांमध्ये जाहिरात देताना मतदार जनजागृतीसाठी आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम वेग घेत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विविध सण- उत्सवानिमित्त विविध प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, ऑडिओ-व्हिडिओ मीडिया या माध्यमातून विविध व्यक्ती ,संस्था ,दुकाने आपल्या व्यवसायवाढीसाठी वैयक्तिक , जाहिरातदारांच्या माध्यमातून जाहिरात देत असतात.त्यामध्ये लोकशाहीच्या मतदानाला महत्त्व देत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जाहिरात देताना “१३ मे रोजी आपले मतदान आहे, न विसरता मतदान करा “यासारख्या एखाद्या ओळीचा राष्ट्रीय संदेश दिला तर त्याचा परिणाम लोकशाहीच्या समृद्धीसाठी होईल.राजकीय जाहिरातीत ही संकल्पना राबवता येणार नसून आचारसंहितेचे पालन आवश्यक आहे.
अराजकीय वाढदिवस, उद्घाटने ,सांस्कृतिक सोहळ्यांबरोबरच ५ मे आंतरराष्ट्रीय बाल दिन,८ मे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जयंती- आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन , जागतिक थॅलेसमिया दिन,१० मे -अक्षय तृतीया – महात्मा बसवेश्वर जयंती ,११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन,१२ मे जागतिक मातृदिन व परिचारिका दिन,१३मे अहमदनगर-शिर्डीचे मतदानाच्या दिवशी देखील सामाजिक बांधिलकी म्हणून विशेष जाहिरात देता येईल.
अहमदनगर व शिर्डीच्या मतदार राजा जागा हो ..१३ मे रोजी लोकशाहीचा धागा हो ,एकच वादा १३ मे रोजी मतदानाचा इरादा,देशाचे ठेवून भान.. चला करू मतदान ,वृद्ध असो की जवान.. चला करू मतदान,जागरूक मतदार ..लोकशाहीचा आधार,आद्य कर्तव्य भारतीयांचे ..पवित्र कार्य मतदानाचे ,लोकशाहीचा सुदिन आहे ..
आज मतदानाचा दिन आहे,मतदानासाठी वेळ काढा ..आपली जबाबदारी पार पाडा,निर्भय होऊन मतदान करा ..अधिकाराचा सन्मान करा,तुमचे मत अहमदनगर साठी महत्त्वाचे आहे. यासारखी घोषवाक्ये वापरता येतील. तसेच आपल्या मनातील मतदार जनजागृती विषयक संकल्पना देखील वापरता येतील.