शिर्डी, दि. ८ मे (जिमाका) :- निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदान करता यावे. यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मतदार सुलभता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले,संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा अशा या सहा विधानसभा मतदार संघात मतदार सुलभता केंद्रांची व्यवस्था प्रशिक्षणाच्या ठिकाणी करण्यात येत आहे. मतदान सुलभता केंद्र हे ९ मे व १० मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. यात अकोले येथे नवीन तहसील कार्यालय, संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवास येथे तहसील कार्यालयात मतदान सुलभता केंद्र असणार आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ही मतदान सुलभता केंद्रांच्या माध्यमातून टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क निभावता येणार आहे.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांनीही त्यांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क मतदार सुलभता केंद्रावर जाऊन बजवावा. असे आवाहन श्री.कोळेकर यांनी केले आहे.