शिर्डी,
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी, (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने मतदान कर्तव्य पार पाडणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे पाहणी केली. तसेच यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी यावेळी कामकाजाच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांतधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी सतीश दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीरामपूर तहसील इमारतीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. याठिकाणी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षिरसागर व किरण सावंत उपस्थित होते. अकोले विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप अकोले तहसील कार्यालयात, संगमनेर विधानसभेचे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (संगमनेर) व नेवासा विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप न्यू ग्रेन गोडाऊन, मिंकदपूर, नेवासा फाटा येथून करण्यात आले.
अकोले विधानसभा मतदारसंघातील ३०७ मतदान केद्रांसाठी ६१४ बॅलेट युनिट, ३०७ कंट्रोल युनिट व ३०७ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १२० बॅलेट युनिट, ६० कंट्रोल युनिट व ८० व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील २७८ मतदान केद्रांसाठी ५५६ बॅलेट युनिट, २७८ कंट्रोल युनिट व २७८ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०३ बॅलेट युनिट, ५५ कंट्रोल युनिट व ७४ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केद्रांसाठी ५४० बॅलेट युनिट, २७० कंट्रोल युनिट व २७० व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०५ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ६७ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील २७२ मतदान केद्रांसाठी ५४४ बॅलेट युनिट, २७२ कंट्रोल युनिट व २७२ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०४ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ७३ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ३११ मतदान केद्रांसाठी ६२२ बॅलेट युनिट, ३११ कंट्रोल युनिट व ३११ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १२२ बॅलेट युनिट, ६० कंट्रोल युनिट व ८४ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केद्रांसाठी ५४० बॅलेट युनिट, २७० कंट्रोल युनिट व २७० व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०४ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ६८ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण १६ लाख ७७ हजार ३३५ इतके मतदार आहेत. १ हजार ७०८ केंद्रांवर नियुक्त मतदान पथकांमध्ये ८ हजार ४00 अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.
लाईव्ह वेब कॉस्टींग कक्षाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहणी
मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष
शिर्डी लोकसभेतील १७०८ मतदान केंद्रांपैकी ८५४ मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग सुरूवात झाली आहे. राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी लाईव्ह वेब कॉस्टींग कक्षात भेट दिली. मतदान केंद्रांवर रवान झालेल्या मतदान पथकातील हालचालींची नोंद घेत झोनल अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील १२ मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टींगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी १३ मे रोजी २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजेपासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणा-क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.
मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. कोळेकर यांनी केले आहे.