ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करीत असताना एकाला पकडल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला.
त्यावरून त्यांनी यंत्रणेवर टीकाही केली. मात्र, हा कर्मचारी अधिकृतपणे दुरूस्ती देखभालीच्या कामासाठी नियुक्त केल्याचे आणि परवानगीची आवश्यक प्रक्रिया पार पाडूनच त्याने तेथे जाऊन दुरूस्तीचे काम केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
लंके यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे.
या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे. ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्यासाठी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.त्यानुसार कर्मचारी आला. याची तिथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती.
सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये प्रवेश करण्याची सायंकाळी ८:२० वाजता नोंद केली. त्यानंतर दोन सीआरपीएफ सुरक्षारक्षकांसोबत संबंधित कर्मचाऱ्याने मतमोजणी हॉलच्या कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी ८:२५ वाजता तिथून निघताना पुन्हा सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये नोंद केली आहे. त्यामुळे ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करीत आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.