नगर मनमाड रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आजून किती बळी घेणार हा रस्ता नागरिकांचा सवाल
शिर्डी प्रतिनिधी
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असून यामुळे अनेक अपघात घडले असून शेकडो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पाच वर्षात दोनही माजी खासदारांनी या रस्त्यासाठी केंद्रातून शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचा दावा केला होता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा हा रस्ता लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते मात्र या सर्वांच्या घोषणा आणि आश्वासने हवेतच विरळून गेले आहे असा अनुभव आजरोजी आला आहे. त्यातच आजपर्यंत या रस्त्याच्या कामाचे टेंडर घेणारा एकही ठेकेदार टिकला नसून काहीजण तर चक्क काम सोडून पळून गेले आहे, त्याच कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी केवळ टक्केवारी आणि कमिशन या दोन कारणानेच कोणताही ठेकेदार टिकत नाही अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. मंग ही टक्केवारी लोकप्रतिनिधी मागतात कि शासकीय अधिकारी हे शोधणे कठीण नसले तरी राज्यातील सर्वात महत्वाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था नेत्यांना का दिसत नाही हाच महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघातील गावांशी संबंधित हा राष्ट्रीय माहामार्ग आहे. शेतकरी, विदयार्थी, छोटे मोठे व्यावसायिक, उद्योजक, साखर कारखाने यासंह श्रीक्षेत्र साईंची शिर्डी व श्रीक्षेत्र शनिशिंगाणापूर याठिकाणी दररोज येणारे लाखो भाविक यांच्यासाठी हा रस्ता महत्वाचा असला तरी आजरोजी वरील सर्वाना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अपघात, वाहनांचे नुकसान, जोखामीचा प्रवास, शालेय विदयार्थ्यांना होणारा विलंब अशा महत्वाच्या बाबींचा सर्वच लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे कि, ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे हे मात्र अजूनही समजलेलं नाही. मात्र हेच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात नगर मनमाड रस्त्याचं भांडवल करून राजकारण करताना लोकांनी अनुभवलं असून लोकांचा संयम सुटला असून नेत्यांवर विश्वासही राहिला नाही. याचा फार मोठा फरक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पडू शकतो असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. मात्र नगर मनमाड रस्त्याला लागलेलं ग्रहणातून नागरिकांना कधी सुटका मिळेल? आणि ह्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? याचं उत्तर मात्र आजरोजी कुणाकडेही नाही हेच खरं दुर्दैव्य म्हणावं लागेल.