जिल्ह्यासाठी श्रीरामपूरकर आग्रही; आज शहर कडकडीत बंद
गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. 15 ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय. याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना जिल्ह्याची घोषणा त्यांनी सोनई येथील एका कार्यक्रमात केली होती. तेव्हापासूनच जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरू लागली. श्रीरामपूर पाठोपाठ संगमनेर तालुक्याने सुद्धा मुख्यालयाची मागणी केली आहे तर शिर्डीकर सुद्धा जिल्हा मुख्यालय होण्यासाठी आग्रही आहेत. याचमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत असून हे जिल्हा विभाजन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलय. 15 ऑगस्ट पूर्वी जिल्हा विभाजन केलं नाही तर मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा जिल्हा कृती समितीने दिलाय आहे.