शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी नजिक निमगाव शिवारात देशमुख चारी जवळील एका हॉटेल मध्ये शनिवारी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की शिर्डी जवळील निमगाव हद्दीत हॉटेल सिमरन येथे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा,शेंबा बुद्रुक येथील तीन ते चार तरुण मित्र शनिवारी शिर्डीत दर्शनासाठी आले असता त्यांनी सायंकाळी राहण्यासाठी लॉज घेतला. त्यानंतर ते दर्शनासाठी निघून गेले दर्शनानंतर त्यांनी पार्टीचा बेत आखला रात्री उशिरा १२च्या दरम्यान मध्यधुंद अवस्थेत मद्य घेऊन सर्व मित्र हॉटेलला परतले बाकी सर्व मित्र लॉज मध्ये गेले . मात्र त्यातील २३ वर्षीय शुभम सुहास नारखेडे हा तरुण हॉटेलच्या गच्चीवर गेला त्या ठिकाणी त्याचा तोल जाऊन हॉटेलच्या मागच्या बाजूला तो कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सर्वजण झोपेतून उठल्यानंतर मित्र कुठेही दिसत नाही म्हणून शोध घेतला असता हॉटेलच्या मागच्या बाजूला तो मृत अवस्थेत दिसून आल्याने मित्रांची तारांबळ उडाली .
हॉटेलवर असलेल्या मित्रांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली . पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले व त्यांनी हॉटेल मालक,मॅनेजर,रूम बॉय व त्या मयत तरुणा बरोबर असलेल्या सर्व मित्राची चौकशी पोलिसांनी केली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व तरुण सधन कुटुंबातील दिसत असून त्यांनी येताना महिंद्रा कंपनीचे एम.एच २८ – बी क्यू – ९८९९ क्रमांकाचे काळ्या रंगाचे थार गाडी आणली असून त्यावर मागील बाजूस मालकाचे नाव व हॉटेल जाधव व वाईन बार असे लिहिलेले आढळून आले आहे. मद्य विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या तरुणांनी शिर्डीत मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करत आपल्या सहकाऱ्याचा जीव गमावल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेत मयत झालेल्या युवकाचा मृत्यू कसा झाला याबाबत शिर्डी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
जाहिरात