मी पोलिस स्टेशनला हजर होतोय:-छत्रपती संभाजीराजे
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तेथे दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीची घटना रविवारी झाली. या पार्श्वभूमीवर गडाच्या परिसरात आणि कोल्हापुरात तणावाचे वातावरण होते.सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील पाच ते सहा हजारावर शिवभक्त गडावर पोहोचल्याने आंदोलनाला धार चढली होती. पोलिसांनी संभाजीराजेंसहित सुमारे ५०० शिवभक्तांवर गुन्ह्याची नोंद केली आहे.काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.