कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या खडकी उपनगरात रहिवासी असलेल्या किरण बाळू सोळसे व महेश जगन म्हस्के या दोन आरोपी तरुणांना मागील महिन्यात कोपरगाव शहर पोलिसांनी एक शस्त्र निर्मिती कारखान्यावर धाड टाकून अटक केली होती.त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,"रविवारी दिनांक २८ जूलै 2024 रोजी कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की,"कोपरगाव शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारधार शस्त्र,तलवारी बनवणारा कारखाना सुरु आहे.
त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे पाहाणी करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस आल्याची चाहुल लागतात तलवारी तयार करणारे किरण सोळसे,बक्या ऊर्फ महेश म्हस्के हे दोघे तेथून आपल्या हातील मोबाईल व बनवलेल्या ९ तलवारीसह इतर साहीत्य तिथेच टाकुन पळवून गेले होते.त्यामुळे कोपरगाव शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या आरोपींवर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,७, व २५ अन्वये गु.र.नं.आय ३३१/२०२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान हे पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली होती व तिथे तात्पुरत्या स्वरुपात किरण सोळसे व महेश म्हस्के दोघे (रा.खडकी) यांना भाड्याने दिल्याचे समजले होते.पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.मात्र या घटनेतील आरोपी मात्र फरार झाले होते.त्यांचा जवळपास महिनाभर पोलिसांना तपास लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
दरम्यान या आरोपींनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.तो सदर न्यायालयाने नुकताच मंजूर केला होता.या गुन्ह्यातील आरोपीं तर्फे अँड.पी.सी.धाडीवाल व अँड.व्ही.जी.बलमे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांची बाजू मांडली होती.
दरम्यान शहर पोलिसांनी त्यात,”आरोपींनी शस्त्रे कोणाला विकली आहे याची माहिती व्हावी तसेच लवकरच गणेश उत्सव विधानसभा निवडणूक आहे या शस्त्राने काही अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून आरोपींना जामीन नको अशी बाजू मांडली होती तर आरोपींचे वकील अँड.पी.सी.धाडीवाल व अँड.व्ही.जी.बलमे यांनी बाजू मांडताना आरोपी हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे नाही तसेच शस्त्र निर्मिती करू शकत नाही.त्यांच्याकडे तसा कुठल्याही शस्त्रसाठा सापडला नाही
,त्यांनी शस्त्र कधीही कोणाला विकले नाही,सदर घटनेत पोलिसांनी शस्त्र जप्त केले नाही व आरोपींचा तथाकथीत कारखाना नाही,याबाबतीत तसा पुरावा नाही” असा युक्तिवाद केला होता.त्यावेळी न्यायालयाने अँड.धाडीवाल व अँड.बलमे यांची बाजू मान्य करून आरोपीं किरण बाळू सोळसे व महेश जगन म्हस्के यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
दरम्यान त्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी या दोन आरोपींना अटक करून त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर अतिरिक्त न्या.भगवान पंडित यांचे समोर हजर केले होते.न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.मात्र आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे दिसून आले नाही.त्यांच्यावर याआधी गंभीर गुन्हे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यामुळे या घटनेमागील असलेल्या बागुलबुवा निघून गेला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.