ईद ए मिलाद उन नबी हा इस्लाम धर्मात साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे, ज्यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उत्सवात साजरा केला जातो. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि सर्व मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणींनी जगाला एकत्व,
बंधुभाव आणि सामाजिक समता या मूलभूत तत्वांची जाणीव करून दिली. ईद ए मिलाद उन नबी ही संधी आहे, ज्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यातील समतावादी दृष्टिकोनावर विचार करणे आणि त्यांच्या शिकवणींमधून प्रेरणा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
मोहम्मद पैगंबर यांचा समतावादी दृष्टिकोन होता,
हजरत मोहम्मद पैगंबरांनी कायम समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या सन्मानासाठी संघर्ष केला. त्यांच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी सर्व मानवांना समान हक्क देण्याची भावना होती. जेव्हा हजरत मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची सुरुवात केली,
तेव्हा समाजात वर्ग, वर्ण, लिंग, आर्थिक स्थिती यावर आधारित भेदभाव सामान्य होता. त्या काळात अरब जगतात गुलामगिरी, स्त्रियांवरील अत्याचार, गरीब लोकांवर अन्याय या गोष्टींना मान्यता होती. मात्र, हजरत मोहम्मद पैगंबरांनी या सर्व अन्यायाविरुद्ध संघर्ष केला आणि एक समतावादी समाज निर्माण करण्यासाठी इस्लामच्या शिकवणींना प्रचारित केले.आणी संपूर्ण जगाला सामाजिक समतेचा संदेश दिला
हजरत मोहम्मद पैगंबरांनी दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे “सर्व माणसे समान आहेत.” त्यांनी शिकवले की, कुठल्याही व्यक्तीची जात, वर्ण, धर्म, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक प्रतिष्ठा त्याच्या माणूसपणापेक्षा मोठी नसते. त्यांच्या शिकवणीमध्ये इस्लामने स्पष्ट केले की, एक व्यक्तीच्या नैतिक गुणधर्मांवरूनच त्याचा खरा सन्मान आहे, न की बाह्य गोष्टींवरून. पवित्र कुराण मध्ये नमूद केले आहे की,
“सर्व मनुष्यजाती एकाच पुरुष व स्त्रीपासून निर्माण झाली आहे” (सूरा 49:13). यावरून स्पष्ट होते की, इस्लामचा मूळ संदेश सर्व मानवांसाठी समानता व बंधुता आहे.यासोबतच स्त्रियांना त्यांचे योग्य हक्क आणी सन्मान मिळवून देण्यासाठी हजरत मुहम्मद पैगंबर यांचे मोठे मोलाचे योगदान आहे.
त्या काळातील अरब समाजात स्त्रियांचे स्थान खूपच खालचे होते. स्त्रियांना कोणतेही हक्क नव्हते आणि त्यांना दुय्यम दर्जाचे मानले जात होते. हजरत मोहम्मद पैगंबरांनी स्त्रियांना सन्मान दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, संपत्तीवर हक्क आणि विवाह तसेच घटस्फोटाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार दिला.
पवित्र कुराणातही स्त्रियांबाबत अनेक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, ज्यामध्ये त्यांना पुरुषांबरोबर समानतेचे स्थान दिले आहे. तसेच समाजास आर्थिक समतेचे तत्त्व देताना हजरत मोहम्मद पैगंबरांनी केवळ सामाजिक समानतेवरच भर दिला नाही, तर आर्थिक समतेसाठीही अनेक तत्त्वे दिली.
त्यांनी गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी जकातची (दान) परंपरा सुरू केली. जकात म्हणजे उत्पन्नाचा एक ठराविक हिस्सा समाजातील गरजूंना देणे. जकातची शिकवण म्हणजे समाजातील आर्थिक विषमता कमी करणे आणि प्रत्येकाला जगण्याच्या योग्य संधी उपलब्ध करून देणे.
इस्लामने दिलेला आर्थिक समतेचा संदेश आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. मात्र जकातीच्या आर्थिक सहाय्यामुळे गरिबांना देखील मुख्य प्रवाहात जोडण्याकामी जकात ही तत्वे फारच महत्त्वाची ठरते.
तसेच हजरत मुहम्मद पैगंबर यांनी समतेची शिकवण आणि आधुनिक समाज घडविण्यासाठीचे मोठे कार्य केले आहे.आजच्या आधुनिक समाजात हजरत मोहम्मद पैगंबरांची समतेची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. जगभरातील अनेक समाजांमध्ये अजूनही जातीय, धार्मिक, आणि आर्थिक विषमता पाहायला मिळते.
अशा परिस्थितीत हजरत मोहम्मद पैगंबरांचा संदेश आपल्याला समतेचा मार्ग दाखवतो. इस्लाम धर्माचा मुख्य आधार म्हणजे सर्वांमध्ये समानता, न्याय आणि बंधुभाव निर्माण करणे. ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने आपण या शिकवणींवर चिंतन करू शकतो आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नही करू शकतो, ईद ए मिलाद उन नबी हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नाही,
तर हजरत मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणींचा उत्सव आहे. त्यांचा संदेश हा सर्व समाजांना एकत्र आणणारा आणि समतेचा आदर्श निर्माण करणारा आहे. त्यांच्या शिकवणींवर विचार करून आपण सर्वांनी एक असा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसेल आणि सर्वांना समान हक्क आणि संधी दिली जाईल असे प्रयत्न आपणही केले पाहिजे
ज्यामुळे संपुर्ण जगात समता प्रस्थापित होण्यास जरासाही विलंब लागणार नाही हे मात्र निश्चित. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त साजरी होत असलेल्या ईद ए मिलादुन्नबी च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शौकतभाई शेख
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर