‘फूट पाडा आणि राज्य करा, हा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणातील निवडणुकांमध्ये त्यांनी शेतकरी, दलित, युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रयत्नातून त्यांनी सातत्याने बेजबाबदार पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. आजघडीला काँग्रेस पक्ष समाजात द्वेष पसरविणारी फॅक्टरी बनला आहे,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यातील ७,६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची आभासी पद्धतीने भूमिपूजन आणि लोकार्पण केली. यामध्ये नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण
प्रकल्पाचे भूमिपूजन, शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन, भारतीय कौशल्य संस्था मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्र या संस्थांचे उद्घाटन आणि दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण यांचा समावेश होता. नव्या वैद्यकीय महाविद्यालायांत अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशीम, भंडारा येथील महाविद्यालये आहेत.