अहिल्यानगर, दि.२६ – जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘स्वीप चॅम्पियन’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून व्यक्ती, संस्था, विविध कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सक्षम मतदार, दिव्यांग मतदार, वंचित महिला घटक मतदार, तृतीयपंथी मतदार, ईव्हीएम -व्हीव्हीपॅट विषयक जनजागृती, वय ८५+ मतदार जनजागृती, कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या क्षेत्रातील केलेल्या मतदार जनजागृतीच्या उपाययोजना, पोस्टल बॅलेट/टपाली मतदान, मतदान करताना प्रलोभनापासून दूर राहणे,शंभर टक्के मतदान, नवमतदार युवक – युवतींचा सहभाग, मतदानाचे आवाहन आदी विविध विषयांवर स्वीप उपक्रम अपेक्षित आहेत.
विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन, रॅलीचे आयोजन, मतदान करण्याची शपथ घेणे , सार्वजनिक ठिकाणे-सभा संमेलने आदी ठिकाणी मतदान जनजागृती करणे , स्वतःच्या सोशल मीडियाचा व माहिती तंत्रज्ञानाचा वापर मतदार जनजागृतीसाठी करणे अपेक्षित आहेत. सर्व उपक्रमांमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असून उपक्रमाशी कुठलाही राजकीय संबंध असता कामा नये.
सहभागी होणाऱ्या घटकांनी आपला प्रस्ताव कामाचा तपशील , छायाचित्रे,वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्रे आदींच्या एका झेरॉक्स प्रतीमध्ये स्वतःचे, संस्थेचे, कार्यालयाचे, शाळा किंवा महाविद्यालयाचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग,जुन्या बसस्थानकासमोर माळीवाडा, मु.पो.ता.ज़ि.अहिल्यानगर -४१४००१ या ठिकाणी समक्ष किंवा पोस्टाने जमा करावयाचे आहे. अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) यांच्याशी ९५९५५४ ५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जास्तीत जास्त व्यक्ती, संस्था व कार्यालये यांनी स्वीप चॅम्पियन पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन स्वीप समन्वयक अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे आणि स्वीप समिती सदस्यांनी केले आहे.