शिर्डी (प्रतिनिधी)दीपावलीनिमित्त शिर्डी मध्ये साई मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून साईनगरी मध्ये रात्रीचा लखलखाट पाहायला मिळत आहे. दिवाळी सुट्ट्या लागल्यामुळे साई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साई संस्थांनच्या वतीने मंदिरात विधिवत लक्ष्मीपूजन व इतर कार्यक्रम होणार आहेत. शिर्डीसह शहरात इमारतींवरही आकर्षक विद्युत रोषणाई दिव्यांची लखलखाट पाहायला मिळत आहे.
दिवाळी सण व विधानसभा निवडणुकीच्या गडबडीतच नागरिक, महिलांनी विविध खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठा आता गर्दीने फुलून गेल्या आहेत. दुकानांमध्येही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. जिकडे तिकडे दिवाळीची लगबग तसेच या सणाचा मोठा उत्साह सर्वांमध्ये दिसून येत आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. पगार, दिवाळी भेट,बोनस हाती पडताच कामगारही आपल्या परिवारासोबत खरेदीला बाहेर पडताना दिसत आहेत.
सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.
शिर्डी, राहता, लोणी, पुणतांबा, कोल्हार, सावळीविहीर आदींसह विविध गावे आणि शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारलेले ठिकठिकाणी ,चौका चौकात दिसून येत आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र इमारतींवर रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई, करण्यात आल्याचे दिसत आहे.
वर्षातला मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील विविध शहरात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके,
आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे. विविध संस्था ,संघटना यांनी माफक दरात रेडिमेट मिठाई, फराळाची स्टॉल मांडले आहेत.
रेडिमेड फराळाला मागणी दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विशेषता ग्रामीण भागात, घरोघरी लाडू ,करंज्या, शंकरपाळे आदी फराळ बनविण्यासाठी महिलांची लगबग घरोघर दिसून येत आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्याच
आठवडय़ात दिवाळी आल्याने शहरातील अनेक गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणा-यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. मार्केटमध्ये विविध स्टॉल मिठाईचे लागले आहेत.यंदा दिवाळीमध्ये मध्यमवर्गीयांचा फराळ विकत घेण्याकडे मोठय़ा प्रमाणात कल आहे. त्यामुळे बाजारपेठेत असे तयार फराळ विक्रीच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत आहे.
लक्ष्मीपूजन व पाडवाला घरोघरी लक्ष्मीपूजनाची, वही पूजनाची सर्वांची लगबग असते.या पूजनासाठी झाडू, झेंडूची फुले, केळीचे खांब, कच्ची फळे, चुरमुरे, फुटाणे, बत्तासे खरेदीकडेही लोकांचा कल दिसून येत आहे. दिवाळीमुळे सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.