चार साधूंना दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या जखमी साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी कैलास रंगनाथ शिंदे (वय 68, रा. रामवाडी, अहिल्यानगर), मल्हारी दादू चांदणे (वय 45, रा. रामवाडी, अहिल्यानगर), बबन देवराम जाधव (वय 70, रा. देहरे, अहिल्यानगर) व विलास मारुती वडागळे (वय 48) हे चार साधू नवीन नगर रस्त्याच्या दिशेने येत होते.
दोन तरुणांनी त्यांना रस्त्यातच थांबवले. त्यांच्याशी काहीवेळ संवाद केल्यानंतर अचानक साधूंना मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळण्यासाठी प्रयत्न करु लागले. हा प्रकार रस्त्याने ये-जा करणार्यांनी बघितल्यावर साधूंना धीर देत औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. याचबरोबर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख रुग्णालयात आले होते.
या साधूंना का मारहाण करण्यात आली हे मात्र समजू शकले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच निंबाळे चौफुलीवर बापलेकीला मारहाण झाली होती. हे वातावरण कुठे शांत होत नाही तर आता शहरात दोन तरुणांनी साधूंना मारहाण केली आहे. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून, पसार आरोपींचा शोध सुरू केला असून दोघांची ओळख पटवण्यात यश आले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते