अहिल्यानगर (श्रीरामपूर) : राज्यात मतदानाची तारखी जशी जवळ येत आहे तशी नेतेमंडळी प्रचारासाठी गावोगावी पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत. सकाळी राज्याच्या एका टोकाला तर रात्री दुसऱया टोकाला, असाच सर्व नेत्यांचा प्रचार सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूर येथे सभा घेत मोठी खेळी खेळली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम अखेर अजित पवार यांनी दूर केलाय. राष्ट्रवादीचा उमेदवार हा महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांची सभा आपणच रद्द केली : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूर केलाय.
राष्ट्रवादीचे उमेदवार लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून, भाऊसाहेब कांबळेंसाठी मुख्यमंत्र्यांची सभा आपणच रद्द केल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे आणि राष्ट्रवादीकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नेवासा आणि श्रीरामपूर या दोन्ही जागेत अदलाबदल करत महायुतीत श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली.
नेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादीनं माघार घेतली. मात्र, श्रीरामपुरात भाऊसाहेब कांबळेंनी माघार घेतली नाही. त्यामुळं येथे महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. “महायुतीचा अधिकृत उमेदवार लहू कानडे असून भाऊसाहेब कांबळे आजारी असल्याचं नाटक करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून येथील मंगळवारची त्यांची सभा रद्द केली. आज त्याच मंडपात आपली सभा होत असल्याचं सांगत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराबाबतचा संभ्रम अजित पवारांनी दूर केला.