शिर्डी : मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ज्या ताकदीने भाजपा उमेदवारांना पाडा असे आवाहन केले आहे, ते लक्षात घेतले तर ओबीसी समाजानेही जर मनावर घेतले तर शिर्डी मतदार संघात मागील 60 वर्षांपासून असलेली घराणेशाही संपून नक्कीच परिवर्तन होऊ शकते, असा ठाम विश्वास शिर्डी विधानसभा मतदार संघातील तरुण ओबीसी नेते संदीप भाऊ बनकर आणि नानाभाऊ भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
जर जातीपातीचे भांडवल करुन कोणी मतं मागत असतील तर आता ओबीसी समाजानेही शहाणे होण्याची गरज आहे, असे मत बनकर यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे जसे मराठा समाजाच्या भल्यासाठी आग्रह धरतात, तशीच एकजूट ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीतील मतदारांनी दाखवून अल्पसंख्याक समाजाचे आश्वासक नेतृत्व डॉ. राजेंद्र पिपाडा यांना आमदार म्हणून निवडून आणल्यास शिर्डी विधानसभा मतदार संघाचा रखडलेला विकास पूर्णत्वास जाऊ शकतो, असेही मत नानाभाऊ भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
डॉ.पिपाडा जरी अपक्ष आमदारकीची निवडणुक लढवित असले तरीही त्यांची निवडणुक आता ओबीसी समाजाने आपल्या हातात घेतली असून शिर्डी विधान सभा मतदार संघातील प्रत्येक वाडी-वस्तीवर घरोघरी जावून ते डॉ. पिपाडा यांचा प्रचार करीत असल्याची माहिती नानाभाऊ भुजबळ व संदीप भाऊ बनकर यांनी दिली आहे.