अहिल्यानगर, दि.२८ – अकोले तालुक्यातील मवेशी येथील पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी चार महिने कालावधीचे पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी ५ डिसेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन राजुर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या मुलांना या मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणात निवास व भोजन सुविधाही दिली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला किंवा शिधापत्रिका, अ
धिवास प्रमाणपत्र, चार पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहेत. उमेदवाराचे वजन किमान ५० किलोग्रॅम आणि वय १८ ते २५ वर्ष असावे. उंची कमीत कमी १६५ सेंटीमीटर असावी. उमेदवाराची निवड शारीरीक चाचणी (८०० मीटर धावणे) व लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी ५० असे एकूण १०० गुण असणार आहेत.
ऑफलाईन अर्ज पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर या पत्त्यावर सादर करावेत. अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रात ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कागदपत्रांच्या मूळ व छायाकिंत प्रतीसह उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती बोकडे यांनी केले आहे.