शिर्डी : “काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की, एवढी दयनीय अवस्था कशी झाली. मी राज्याचे नेतृत्व करत असताना 82 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी 82 जागांच्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 जागा आणल्या. त्यामुळे त्याचं आकलन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे,” अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर शिर्डीत केलीय.
यावेळी त्यांची कन्या नवनर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं मंदिर प्रमुख विष्णु थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा साई मूर्ती तसंच शाल देवून सत्कार केला. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.चौदा वर्षे मी वनवास भोगला – मला त्रास देणारे घरी बसले या वक्तव्यावर बोलताना चव्हाण म्हणाले,
“शेवटी मी ही मनुष्य आहे. मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी चौदा वर्षे वनवास भोगला. मला कोणाही विषय राग नाहीये मी साईबाबांचा भक्त असल्याने कोणावरही विनाकारण टीका करणे माझा उद्देश नाही. परंतु मला भावना आहेत. त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेल. त्यामुळे त्यांनी मनावर न घेता राजकारणात हार जीत होत असते, हे लक्षात ठेवावं. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवय असंही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे – दोन अडिच वर्ष मुख्यमंत्री पद भोगल्यानंतर साहजीकच आहे काहीसं मनामध्ये दुःख होत असतं. मात्र एकनाथ शिंदे हे कुठेही नाराज नसल्याचं दिसून येतय. त्यांनी मोठ्या मनाने महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये कोणत्याही प्रकारचा आडथळा निर्माण होणार नाही असं सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी आमची चिंता करु नये – संजय राऊत यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या त्याबद्दल त्यांना काय वाटतय यावर अधिक भाष्य करणं योग्य राहील. आमच्या सरकारमध्ये कोणाला कोणतं मंत्री पद मिळणार यांची चिंता त्यांनी करु नये काँग्रेसचा राडीचा डाव सुरू – काँग्रेसनं आताच रडीचा डाव सुरू केलाय. 2029 मध्येही ते निवडून येणार नाहीत असं दिसत. त्यामुळे त्यांनी पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडण्यास सुरवात केली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केलीय.
राज्यसभेवर येण्या इतपत संख्या बळ नाही – राज्यसभेत येण्याइतपत तरी विरोधकांकडे संख्याबळ असलं पाहिजे. सर्व विरोधक मिळून 40-46 जागा आहेत. त्यात कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल. राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यसभेचा उमेदवार देखील निवडून येवू शकत नाही. एकाला दरवेळी संधी द्यावी लागले अशी स्थिती सध्या विरोधकांची झाली असल्याची टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केलीय.