मुंबई (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवार पाच डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर विविध वरिष्ठ नेते व मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…
असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद व गोपनियतेची शपथ घेत स्वत:च्या नावावर वेगळा विक्रम रचला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली.
फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.
विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला, महायुतीला राज्यात 237 जागांवर यश मिळत स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामध्ये, 132 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे, भाजप नेताच मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.
त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेन्स होता. अखेर एकनाथ शिंदे यांचीही नाराजी दूर झाली असून त्यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली, तेव्हाच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा चेहरा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, गावागावात, मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर, नियोजित वेळ आणि तारखेनुसार आज गुरुवारी शपथविधीचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने नेते, मान्यवर आमदार, खासदार ,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.