राजकीय
माझी लाडकी बहीण” योजनेची विशेष मोहीम
अहमदनगर, दि.११ जुलै २०२४ (जिमाका) – अहमदनगर जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि आरोग्य सुधारण्यासाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची दोन दिवसीय विशेष मोहिम आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या मोहिमेच्या आयोजनाच्या सूचना दिल्या आहेत.
जाहिरात
ही मोहिम 12 आणि 13 जुलै 2024 रोजी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना ऑनलाईन आणि ऑफ़लाईन अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. ग्रामपंचायत, वाडी, वस्ती आणि वॉर्ड स्तरावर योजनेचा प्रचार केला जाईल. शिबिर स्थळी पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असतील.
विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतु केंद्र कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांची पथके तयार केली जातील. शिबिरांमध्ये जास्तीत जास्त अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
महानगरपालिका, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना शिबीर आयोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विविध शिबिरांना भेट देतील. योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोहिमेचा अहवाल 15 जुलै 2024 रोजी सादर करायचा आहे. अशा सूचना ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.