अहिल्यानगर दि.१७- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे…लोकशाहीच्या उत्सवाचं…शाळेत प्रवेश करताच शाळेतील कापडी, एखादं भित्तीचित्र किंवा रांगोळी लक्ष आकर्षून घेते. शिवाय इथले ‘बोलके फळे’ अभिनव पद्धतीने संदेश देत आहेत. चित्र आणि घोषवाक्य या माध्यमातून साधला जाणारा हा संवाद विशेष ठरला आहे.]
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे. याअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोमार्फत कमी मतदान असलेल्या गावात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. विविध शाळा-महाविद्यालयांनी रॅली, रांगोळी, भित्तीपत्रक, वचनपत्रे आदींच्या माध्यमातून जनजागृतीत सहभाग घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञादेखील घेण्यात येत आहे.
विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामान्य नागरिकांनीही या प्रयत्नात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी कोपरगाव येथील जिल्हा परिषद शाळांधील शिक्षकांनी शाळेतील फळ्यांचा अभिनव पद्धतीने उपयोग करून घेत मतदानाचा प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमात सहभाग घेतांना कोपरगाव येथील शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर लावलेल्या फळ्यांचा कल्पकतेने वापर केला आहे. रंगीत खडूंचा उपयोग करीत या फळ्यांवर मतदान जागृतीचे विविध संदेश सुंदररितीने रेखाटण्यात येत आहेत. रोज नवनवीन संदेश या माध्यमातून देण्यात येत आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात गिरमे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अनुज ढुमणे यांनी आपली कलेची आवड आणि मतदान जागृती उपक्रमाची सांगड घालत शाळेच्या फळ्यावर मतदानाचे आवाहन करणारी सुंदर चित्रे आणि घोषवाक्ये अभिनव पद्धतीने रेखाटली आहेत. स्वतः कलाशिक्षक नसतानाही आपल्या छंदाचा उत्स्फूर्तपणे आणि कर्तव्य भावनेने उपयोग करून त्यांनी स्वीप उपक्रमात सहभाग घेतला आहे.
गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनीही त्यांच्या या कलेला प्रोत्साहन दिले आहे. विद्यार्थ्यांनाही ही चित्रे प्रेरक ठरली असून उपक्रमात त्यांचाही सहभाग मिळतो आहे. कोपरगावमध्ये श्रीमती शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इतरही शाळांमधून फळ्यावर असे संदेश रेखाटले जात आहेत. या माध्यमातूनशाळेत येणाऱ्या पालकांपर्यंत मतदानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचत आहे.
चित्र आणि मोजके शब्द यामुळे फळ्यावरील संदेश पाहणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविला जातो. शिवाय फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सॲप यासारख्या समाज माध्यमातूनही हे चित्ररूप संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.
अनुज ढुमणे- शालेय जीवनापासून चित्र रेखाटण्याची आवड आहे. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने कलेचा उपयोग करून मतदानाचा संदेश देत आहे. एक चित्र हजार शब्दांची भावना व्यक्त करणारे असते. म्हणून माझ्या कलेचा मतदार जागृतीसाठी उपयोग केला. लोकसभा निवडणुकीतही अशी चित्रे फळ्यावर रेखाटली होती. विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून घेतो. अशा उपक्रमात सहभागामुळे समाधान मिळते.