पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर बावधनमधील डोंगराळ भागात कोसळलं. या अपघातात दोन पायलटसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यातच हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती.
यानंतर आता जवळपास दीड महिन्यात पुन्हा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.पुण्याच्या बावधनमध्ये सकाळी साडे सात वाजता हेलिकॉप्टर कोसळलं. धुक्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता पोलीस सहआयुक्तांनी वर्तवली आहे.
हिंजवडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे. हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झालेला आहे. हेलिकॉप्टरमधील आग अद्याप धुमसतेच आहे. घटनास्थळी भीषण परिस्थिती आहे.धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला.
या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले. त्यात दोन पायलट आणि एका इंजिनीअरचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह ओळखताही येत नाहीएत. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरनं सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उड्डाण केलं होतं. काही अंतर कापल्यानंतरच हेलिकॉप्टरला अपघात झाला. दिल्लीतल्या हेरिटेज कंपनीच्या मालकीचं असलेलं हेलिकॉप्टर ऑगस्टा बनावटीचं होतं.