शिर्डीसाठी आग्रही असणारे ठाकरे गटावर नाराज बबन घोलप यांचा शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटाच्या गळाला लागला. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे माजीमंत्री बबन घोलप आणि नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्याआधी घोलप यांनी खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आगपाखड केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ नये म्हणून या दोघांनी आडकाठी आणल्याचा आरोप केला. नाशिकमधून ठाकरे गटातून जे कुणी बाहेर पडले, त्या प्रत्येकाचे मुख्य लक्ष्य राऊत होते.
घोलप यांनी वेगळे काहीच केले नाही. घोलप हे शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांचे पुत्र योगेश यांनी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. घोलप यांची एक मुलगी मार्चमध्ये भाजपमध्ये दाखल झाली. सध्या घोलप कुटुंबिय शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजप या तीन पक्षांत विभागले आहे.
घोलप हे स्वत: ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते. या जागेवर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव निश्चित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. शिंदे गटाने शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांचे नाव आधीच जाहीर केले आहे. म्हणजे घोलप यांच्यादृष्टीने शिर्डीचा विषय संपला आहे.