शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात हार फुले अर्पण करण्यांवर असलेले प्रतिबंध हटवावे, यासाठी मी दाखल केलेल्या अर्जावर (सिव्हिल अर्ज क्रं.५८४६) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊन ही बंदी उठविली आहे. त्यामुळे शिर्डी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरणावर हार फुले अर्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही”
यावर माझा दृढ विश्वास बसलेला आहे, मात्र श्रेय दुसरेच घेत आहेत. मला वाटले होते. साईबाबांच्या भीतीपोटी तरी नामदार विखे पाटील खोटे बोलणार नाहीत. पण तेही खोटे बोलत आहेत. उच्च न्यायालयाने माझ्या अर्जामुळेच हा प्रतिबंध हटवला आहे .अशी भावनिक प्रतिक्रिया मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तसेच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणारे अर्जदार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की, कोरोना नंतर देशातील सर्व मंदिरांमध्ये प्रवेश आणि हार फुले प्रसाद अर्पण करण्यावर असलेले प्रतिबंध हटविण्यात आले होते. मात्र पवित्र शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात हार फुले प्रसाद अर्पण करण्यावर त्याआधीपासून घालण्यात आलेले प्रतिबंध कायम ठेवण्यात आले होते. शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरात फूल विक्रेते ग्राहकांची लूट करतात, असा कांगावा करत कोणाच्या सांगण्यावरुन कट-कारस्थान करुन सदरचे निर्बंध घालण्यात आले होते, हे सर्व शिर्डीकरांना चांगलेच माहिती आहे.
या संदर्भात आपण वगळता अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेते यांचे दुःख दिसले नव्हते. एकमेव आपण माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आधीपासून दाखल असलेल्या एका जनहित याचिकेत अर्ज करून (सिव्हिल अर्ज क्रं.५८४६) या विषयाचे गांभीर्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
फुल शेती आणि हार, फुल, बुके विकून उपजीविका करणाऱ्या शेकडो छोट्या-मोठ्या फुल व्यवसायिकांचे तसेच फूल उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आपण मा.उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. उपजीविकेसाठी केल्या जाणाऱ्या हार-फूल विक्रीस “लूट” म्हणून संबोधणे योग्य होणार नाही, अशी आपली भूमिका होती.
या संदर्भात मा.उच्च न्यायालयात उक्त सिव्हिल अर्ज ५८४६ द्वारे तर या विषयाला वाचा फोडलीच परंतु, राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी पत्रव्यवहार करुन त्यांचेकडून राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी याविषयी कार्यवाही करावी, असे आदेश मिळविले होते. त्यांच्या या प्रशासकीय तसेच न्यायालयीन दीर्घ लढ्याला आज अखेरीस यश येऊन मा.उच्च न्यायालयाने फुल-हार अर्पण करण्यावरील बंदी उठविली आहे.
कोर्टाच्या आजच्या आदेशामुळे शिर्डी परिसरातील फुल उत्पादक आणि किरकोळ हार-फुल विक्रेते यांच्यामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असून अनेकांनी फोन करून धन्यवाद दिले आहेत. तसेच या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना उच्च न्यायालयाचा निकाल येताच राज्याचे तत्कालीन मंत्री विखे पाटील व त्यांचे समर्थक श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावलेले पाहून, निदान श्रद्धेय साईबाबांच्या भीतीपोटी तरी विखे खोटे बोलणार नाहीत, असे मला वाटले होते, अशी कोपरखळी डॉक्टर पिपाडा यांनी मारली.
विखे समर्थकांनी साईबाबांच्या मंदिरात फूल विक्रेत्यांकडून भक्तांची लूट होते अशी तक्रार अर्ज करून फुल वाहण्याला बंदी करायला भाग पाडले होते. मात्र आपण शासन दरबारी पाठपुरावा केला व उच्च न्यायालयात अर्ज केला. दोन वर्षांच्या लढाईनंतर आज त्यां संघर्षाला यश आले आणि उच्च न्यायालयाने घातलेले प्रतिबंध हटविले. दिगंबर कोते सुरेश आरणे यांचेही सहकार्य आपल्याला त्यावेळी मिळाले.त्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला आहे. असे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकात म्हटले आहे .
शिर्डी मध्ये फुल विक्रेत्यांनी डॉ राजेंद्र पिपाडा यांनी शासन दरबारी व उच्च न्यायालयात स्वत:च्या नावाने अर्ज केला व न्यायालयाने ती बंदी उठवली त्याबद्दल फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत केले, पेढा भरवला व सत्कार केला व सर्वांनी मिळुन आनंदोत्सव साजरा करुन डॉ.पिपाडांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.