कोपरगाव प्रतिनिधी / “कोपरगाव शहरात हनुमान नगर येथील गेट येथे आपल्या सावत्र भावाचा खून झाला असून त्याचे प्रेत एका इसमाने गोणीत घालुन जाताना आपण पाहिले असून आपण ताबडतोब घटनास्थळी हजर व्हावे” असा फसवा फोन पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर करून कोपरगाव शहर पोलिसांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी परशराम रावसाहेब दिघे (वय-३१) या त्याच भागातील तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी राज्याचे पोलीस कायमच धावून येतात.
अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी राज्य पोलिसांनी मदतीसाठीचा डायल ११२ योजना सुरु केली आहे.पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर ८सप्टेंबर २०२१ ला या योजनेला सुरुवात केली आहे.या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात ११२ नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ०७ मिनिटामध्ये पोलिसांची नागरिकांना मदत मिळत आहे.त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले असून ही सुविधा लोकप्रिय ठरली आहे.
मात्र या सुविधेचा दुरपयोग करून त्यांची दिशाभूल करणाऱ्या असामाजिक तत्त्वांची कमी नाही असे वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.शहर पोलिस ठाण्यात मागे काही महिन्यांपूर्वी अशीच घटना उघडकीस आली होती.
दरम्यान यातील आरोपीने शहर पोलिसांना फोन करून,”आपल्या शहरातील हनुमाननगर येथील गेट समोर आपल्या सावत्र भाऊ संतोष अडांगळे याचा पहाटे ०३ वाजता खून झाला असून त्याला गोणित घालुन दुसराआरोपी पवार हा घेऊन जाताना आपण पाहिले असल्याचे असत्य कथन केले होते.त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके,पो.कॉ.धोंगडे,श्री साळुंके आदी अन्य सहकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले असता त्या ठिकाणी सदर पथक गेले होते.
सदर ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यावर पोलिसांचे डोके चक्रावून गेले असता त्यांनी फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेतला होता.त्याने आधी फोन उचलला नाही.मात्र त्याचा शोध घेतला असता त्याने त्यास दुजोरा दिला होता.
दरम्यान खात्री कारणासाठी त्याची पत्नी रत्नमाला दिवे हिच्याकडे त्याबाबत शोध घेतला असता तिने मयताचा फोन ( ७२१८० १९६५८) पोलिसांना दिला असता त्यावर पोलिसांनी डायल केले असता सदर इसम जिवंत असल्याची पोलिसांची खात्री झाली.त्यामुळे आरोपी इसम परशराम दिवे याने पोलिसांना खोटा फोन करून त्यांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपी परशुराम दिवे याचेवर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्यास अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बबन तमनर हे करत आहेत.
“दरम्यान नागरिकांनी कोणत्याही घटनेची पडताळणी केल्याशिवाय पोलिसांना खोटा फोन करून दिशाभूल करू नये;असे केल्यास आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी” असे आवाहन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.