शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी केलेले पराभूत भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी नुकतीच मुंबई येथे भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहे.
डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी जाऊन तेथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व राज्यात भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. त्याबद्दल त्यांचा सत्कार केला. एवढेच नाही तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत निखिल पिपाडा, कन्या टिंकल पिपाडा आदी उपस्थित होते.
डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे विखे पा. यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात. त्यामुळेच त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना विशेष विमान शिर्डीला पाठवून मुंबईला निवडणुकी अगोदर बोलावले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली.
मात्र तरीही डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी न काढता ते निवडणूक लढले , भाजपात बंडखोरी केलेल्या जिल्ह्यातील दोन नेत्यांना भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निलंबित केले मात्र डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना पक्षातून अद्यापही निलंबित केलेले नाही. या निवडणुकीत ते पराभूतही झाले.
मात्र तरीही त्यांनी मुंबई येथे जाऊन भाजपाचे नेते व भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर जाऊन चर्चा केली. भेट घेतली. सत्कार केला.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या मोठ्या चर्चेत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी नंतर शिर्डी मतदार संघात डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या फडणवीस भेटी संदर्भात सध्या मोठी चर्चा होत आहे. जरी डॉक्टर राजेंद्र पिपाडा भाजपाचे बंडखोर म्हणून लढले तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे यावरून दिसून येते. व तसे तालुक्यात बोलले जात आहे.