शिर्डी शहरात आज सकाळी खळबळजनक घटना घडली असून साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई लक्ष्मी पार्किंग मध्ये भर दिवसा अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे
मिळालेल्या माहितीनुसार व दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार घडलेली घटना अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साई लक्ष्मी पार्किंग येथे दोघे तरुण आपल्या स्प्लेंडर मोटारसायकल वरून आले व त्यांची काही तरुणांसोबत जुन्या वादातून पुन्हा बाचाबाची झाली आणि त्या दोघा तरुणांनी हातात असलेला लाकडी दांडा उगारत आणि सोबत असलेल्या पिस्तूल मधून हवेत गोळीबार करत पार्किंग मधून पळ काढला पार्किंग शेजारी असलेल्या हॉटेल गुरुस्थान समोर पुन्हा एक गोळी हवेत झाडली मात्र ती गोळी अतिशय लांब अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या काचेला भेदून गेली सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पोलिसांना गोळीबार केलेल्या पिस्तुलातील काडतूस व रिकाम्या पुंगळ्या घटनास्थळी मिळून आल्या तर लाकडी दांडा आणि स्प्लेंडर मोटारसायकल पार्किंग मध्येच सोडून त्या दोघा अज्ञात तरुणांनी पळ काढला….
यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी याठिकाणी केली होती. घटनेनंतर काही वेळात शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगविली.
गोळीबार करणारे तरुण कोण होते..? कशावरून वाद झाले..? याबाबत अधिक माहिती पोलिस तपासातून पुढे येईलच मात्र भर दिवसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने घटनेचा कसून तपास करत दिवसा ढवळ्या गोळीबार करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करत कायद्याचा धाक निर्माण करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत होते.