शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. कुठलाही स्टार प्रचारक आणि जाहीर सभा न घेता एक खांबी निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या प्रचार यंत्रणेने वेग घेतला असून महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार डॉ.पिपाडा बाजी मारून नेतील, अशी चर्चा सुशिक्षित आणि बेरोजगार युवा वर्गामध्ये जोर धरत आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण आठ उमेदवार एकमेकांविरुद्ध दंड थोपटून असले तरी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवार यांच्यामध्येच होईल असे सुरुवातीला वाटत होते. महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार पहिल्यांदाच आमदारकीसाठी नशीब आजमावत आहेत, तर महायुतीचे उमेदवार मागील सात टर्म पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच एकमेकांविरुद्ध जाहीर टीका टिप्पणी आणि वक्तव्य यामुळे दोन्हीही उमेदवार लोकांमध्ये चांगलेच चर्चिल्या जात होते. तशातच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या डॉ राजेंद्र पिपाडा यांनी प्रचारादरम्यान विकास हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवले असून ते कशाप्रकारे विकास घडवून मतदारसंघाचा कायापालट करू इच्छितात यावरच अधिक भर देताना दिसून येत आहेत.
तशातच प्रचार रॅली दरम्यान त्यांना काही शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी भेटून शुभेच्छा देत श्रीरामपूर कोपरगाव बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे त्यांना शैक्षणिक अडीअडचणींचा सामना करावा लागत असल्याबाबत गाऱ्हाणे मांडले. डॉ. पिपाडा यांनी आपण सर्वांनी मला आमदार म्हणून निवडून देताच पहिल्या दोन महिन्यातच मी प्राधान्य क्रमाने श्रीरामपूर-कोपरगाव बस सेवा तर पूर्ववत सुरू करेलच
त्याबरोबरच संपूर्ण मतदारसंघातील बस सेवा आणि बस फेऱ्यांचे नियोजन करताना विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. राहाता येथील बस स्थानक प्रशस्त, दर्शनीय व सुविधा युक्त करण्यावर माझा भर असेल. तसेच ठराविक भांडवलदारांच्या नियंत्रणात असलेली शिक्षण व्यवस्था सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देणे आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्रांचे जाळे उभारण्यावर आपला भर असेल असे त्यांनी ठासून सांगितले.
कोणत्याही क्रांती आणि परिवर्तनाचे शिलेदार हे युवकच असतात. त्यामुळे माझा शिर्डी मतदार संघातील युवा शक्तीवर प्रचंड विश्वास असून ते यावेळी परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास डॉ. पिपाडा यांनी व्यक्त केला आहे.