अहमदनगरच्या अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिरानेच त्याच्या दोन भावजयींचा म्हणजेच वहिनींचा खून केला आहे. हत्येनंतर दीर घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
आरोपीचे नाव दत्तात्रय प्रकाश फापाळे असं असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसंच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. आरोपी माथेफिरू असल्याची माहिती समोर येत आहे.
अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने दोन भावजयांचा निर्घृण खून केला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या हा हत्येचा थरार घडला आहे. दोन्ही महिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. धारदार कोयत्याच्या सहाय्याने दिराने दोन्ही वहिनींवर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.