श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ…संस्थानच्या रुग्णालयात प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची होणारी हेळसांड थांबवुन रुग्णांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा तसेच रुग्णांना दर्जेदार व वेळवर उपचार मिळावेत तसेच तेथील वेगवेगळ्या विभागातील अडचणी दूर व्हाव्यात या आशयांचे निवेदन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. यावेळी आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे,ट्विंकल पिपाडा व इतर उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत. साई संस्थानचे रूग्णालय हे नगर जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातील रूग्णाला वरदान ठरले आहे. मात्र तेथील अनागोंदी कारभारामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रूग्णांच्या जिवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार उदभवत आहे.
याबाबत आम्ही स्वत अनुभव घेतला असुन राहाता येथील पंकज बागरेचा यांचा अपघात झाला बेशुद्ध अवस्थेत त्यांना संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना तात्काळ एमआरआय व सिटीस्कॅनची गरज होती. परंतु पेशंटला स्कॅन रुममध्ये नेण्यासाठी संस्थानचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. शेवटी माझा मुलगा निखील पिपाडा व योगेश मुनावत यांनी स्ट्रेचर लोटत पेशंट स्कॅन रुममध्ये नेले. अतिशय दुर्दैवी घटना त्यादिवशी पहावयास मिळाली. हि परिस्थीती तातडीने बदलणे गरजेचे आहे.
अपघातात जबर जखमी झालेल्या रूग्णाला कॅज्युलीटी, सीटी स्कॅन, एमआरआय या विभागात नेण्यासाठी प्रशिक्षीत कर्मचारी दोन तीन पाळ्यात चोवीस तास तैनात असावेत. सध्या याबाबतची परिस्थीती अतिशय गंभीर आहे. ब-याचदा रूग्णाला हलविण्यासाठी कर्मचारी जागेवरच नसतात.
रूग्णालयातील सर्वच कर्मचा-यांना तातडीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. रूग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरचे कर्मचारी देखील प्रशिक्षीत नाहीत. त्याचे कुणी ऐकत नाही. त्यांना पुरेशी माहिती देखील नसते असा रूग्णांचा अनुभव आहे. रूग्णालयासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमून त्यांना अधिकार देणे गरजेचे आहे.
आणिबाणीच्या वेळी हे अधिकारी रूग्णाच्या नातेवाईकास मदत व मार्गदर्शन करू शकतील.अपघातग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करण्याची आणि पोलीसांत तक्रार नोंदवीण्याची गरज असते. त्यासाठी कॅज्युलीटी विभागात एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावा. तेथे पोलीस कर्मचारी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पोलीसात तक्रार देण्यासाठी पळापळ करावी लागते. त्यांना पोलीस ठाण्यात योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.
रूग्णालयातील सोनोग्राफी विभाग ब-याचदा बंद असतो. सीटीस्कॅन आणि एमआरआय करण्यासाठी तिन तीन महिन्यांची वेटींग लिस्ट असते. कर्मचा-यांवर त्याचा मोठा ताण पडतो. हे लक्षात घेऊन आणखी एक सिटीस्कॅन व एमआरआय मशिन तेथे बसवीणे गरजेचे आहे.आणीबाणीच्या प्रसंगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसतो. हे लक्षात घेऊन अतिदक्षता विभागाचा विस्तार केला जावा.
साई संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांकडून आपआपसात धक्का बुक्की व शिविगाळ होते अशा स्वरुपाच्या बातम्या वर्तमान पत्रात वाचल्या. ही अतिशय खेदजणक बाब आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या संस्थानच्या हॉस्पिटलची बदनामी होत आहेत. याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर डॉक्टरांअभावी बंद आहे. एमआरआय,सीटीस्कॅन करिता तीन-तीन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका अशा तातडीच्या रुग्णांकडे कॅज्युल्टीत लक्ष दिले जात नाही. तसेच बेड उपलब्ध नसल्याचे कारणे सांगून पेशंट बाहेर पाठवले जातात. शिर्डी संस्थानचे सुपर हॉस्पीटल नव्हे तर रेफर हॉस्पीटल झाले आहे असे वाटु लागले आहे.
-डॉ.राजेंद्र पिपाडा