शिर्डी ( प्रतिनिधी )- शिर्डी शहरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर व 1 जानेवारी च्या दरम्यान नागरिक व साई भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मद्यपीकडून होणारे अपघात टाळण्याकरिता वाहन तपासणी बरोबरच वाहन चालकांची मद्य अथवा इतर नशिले पदार्थ सेवन केलेले आहेत किंवा नाही याबाबतची तपासणीसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साई दर्शनाने व्हावे म्हणून शिर्डी शहरात साई भक्तांची लाखोंची गर्दी होत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर तसेच साईभक्त व नागरिकांची सुरक्षितता जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्याकरिता वाहतुकीचे सुरळीत नियोजन करणे वाहतुकीस अडथळा होईल अथवा अपघातास कारणीभूत ठरतील अशा बाबींवर पोलिसांची करडी नजर असणे अधिक गरजेचे आहे. नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली या दोन दिवसात एन्जॉयमेंट म्हणून अनेकजण रंगीत संगीत पार्ट्या साजऱ्या करतात.
आनंदोत्सवा करिता वाईन शॉप बिअर बार परमिट रूम यांना रात्री वेळ सुद्धा वाढवून दिलेला असतो. त्यामुळे पार्ट्यांचे प्रमाण सुद्धा या दोन दिवसात जास्त असते.दरम्यानच्या काळात रस्त्यावर दारूच्या तसेच इतर नशिले व अमली पदार्थांच्या नशेत अनेक चालक वाहन चालवत असतात. त्यामुळे दारू पिऊन अथवा नशा करून वाहन चालवणे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवावर बेतनारे व कायद्याचे उल्लंघन करणारे असते. याचे भान नशाबाजांना राहत नाही दारूच्या तसेच इतर पेय अथवा पदार्थांच्या नशेत वाहतुकीचे नियम व शिस्त न पाळता ड्रायव्हिंग केली जाते.
परिणामी अपवाद वगळले तर मोठ्या संख्येने अपघात घडतात. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी अशा प्रकारे अपघात होण्याची संभाव्यता मोठी असते.ही बाब विचारात घेऊन पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणे व नशाबाजांचे विरोधात कारवाईची मोहीम उघडणे गरजेचे आहे. काहींचा अपवाद सोडला तर अनेक मद्यपी तरुण बेवडे नशाबाज युवक नशे मध्ये साई भक्तांना सुद्धा त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे रोड रॉबरी सारखे व इतर अनेक गुन्हे नशेमध्येच घडतात. ही बाब विचारात घेता पोलिसांनी विना नंबर प्लेट तसेच चित्र विचित्र नंबर प्लेट यासह नशा करून ड्रायव्हिंग करणाऱ्यां विरोधात कठोर व कडक कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.अन्यथा या मद्यपी व नशाबाज ड्रायव्हरांमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच साई भक्तांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिर्डी शहराला जोडणाऱ्या सर्व बाजूंच्या रस्त्यावरून भाविकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे.नगर ते मनमाड असो अथवा शिर्डी नाशिक शिर्डी संभाजीनगर या सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे या रस्त्यांवर सुद्धा अपघात घडू शकतात. यावर उपाययोजना म्हणून पोलिसांनी वाहन तपासणी मोहिमे बरोबरच चालकांची मद्य किंवा इतर नशिले पदार्थ सेवन केलेले आहेत कींवा नाही याची तपासणी करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.