शिर्डी ( प्रतिनिधी) गेल्या दोन-तीन दिवसापासून शिर्डी व परिसरामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये सर्वात अधिक थंडी सध्या या दिवसात जाणवत आहे. सध्या पडत असलेल्या थंडीचे प्रमाण खूपच अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रस्ते ही रात्री पाऊस पडल्याचे दिसून येतात. ठिक ठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे कपाटातील स्वेटर मफलर कान टोप्या असे उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच दुकानातही उबदार कपड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
हाडं गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. शनिवारी राज्याचे नीचांकी तापमान नोंदवले गेले. असे समजते. दरम्यान उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तापमान घटून पुन्हा काही अंशांनी वाढ होईल. तापमानात पुढील पाच दिवस कोणताही बदल नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा हा लक्षद्वीप आणि मालदीवला जोडून असणाऱ्या भागात आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपेक्षा 5.8 किमी असल्याने येत्या 24 तासात ही स्थिती पश्चिमेकडे सरकणार आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटाचा इशारा देण्यात आला आहे .परिणामी महाराष्ट्रात ही कडाक्याची थंडी पडत आहे . उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र असून तापमानात घट होत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. शिर्डी शहरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे, आगामी पाच दिवस शहराच्या तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.