शिर्डी आमरण उपोषण | माजी नगरसेवक आरणे यांचे उपोषण; काळाबाजारी करण-यावर कारवाई का नाही?
साई संस्थांन मध्ये देणगी कार्यालयातील अपहार व एका माजी नगरसेवकाने गैरमार्गाने आरती पास विकल्याच्या प्रकरणाला सर्वप्रथम बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली होती. सदर वृत्ताची दखल घेत साई संस्थान प्रशासनाने देणगी कार्यालयातील अपहार करणाऱ्या चासकर नावाच्या कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केला आहे मात्र आरती पासेसचा काळाबाजार करणाऱ्या त्या माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांवर गुन्हा का दाखल केला नाही ? शिर्डी पोलीस स्टेशनला फक्त तक्रार अर्ज दाखल करून हे प्रकरण दडपल्याच्या आरोप करत शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सुरेश आरणे हे गुरुवारी साईसमाधी मंदिराच्या चार नंबर प्रवेश द्वारासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
जोपर्यंत या घटनेचा सखोल तपास होऊन पासेसचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू असल्याची माहिती सुरेश आरणे यांनी दिली असून आपल्या मागणीवर ते ठाम आहे.विशेष म्हणजे अतिशय साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता त्यांनी सुरू केलेले ह्या आंदोलनाची जोरदार चर्चा शिर्डी शहरात सुरू आहे मात्र दै. प्रभात च्या बातमीचा फ्लेक्स, श्री साईबाबांचा फोटो लावून छोट्याशा मंडपात सुरेश आरणे यांचे उपोषण सुरू आहे,
या उपोषणाला उच्च न्यायायलयाचे वकील अविनाश शेजवळ, काँग्रेसचे शिर्डी शहर अद्यक्ष सचिन चौगुले, जेष्ठ पत्रकार जितेश लोकचंदानी, जेष्ठ पत्रकार किशोर पाटणी, पत्रकार राजेंद्र बनकर, शिवसेनेचे सुनील परदेशी, आरपीआय चे शिमोन जगताप, ऍड विक्रांत वाकचौरे, आरटीआय चे जेष्ठ कार्यकर्ते दिगंबर कोते, साई संस्थानचे जेष्ठ माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, माजी उप नगराध्यक्ष विजयराव जगताप, जेष्ठ पत्रकार माधव ओझा, नानासाहेब काटकर, विनोद गायकवाड यांसह अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी सुरेश आरणे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
बाबांच्या नगरीत सर्वांना सारखाच न्याय असावा कारण एका प्रकरणात साई संस्थान प्रशासन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करते तर पासेसच्या काळ्याबाजाराचे आरोपी माहीत असूनही ह्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष का ? कुणाचा दबाव आहे का ? सुरेश आरणे , माजी नगरसेवक, उपोषणकर्ते, शिर्डी