धर्मादाय उपायुक्त कार्यालयात हिशोबपत्रके दाखल करण्यासाठी महत्वाची सुचना
अहमदनगर दि. 29 जुलै (जिमाका) :- धर्मादाय उपायुक्त कार्यालयात दाखल होणाऱ्या न्यासाचे हिशोबपत्रकासोबत लेखापरीक्षण करणारे सनदी लेखापाल व अधिकृत लेखापरीक्षक यांच्याकडील आयसीएआय यांनी प्रदान केलेले सीए मेंबरशिप प्रमाणपत्र व अधिकृत लेखापरीक्षक म्हणून मान्यता दिलेल्या आदेशाची प्रत धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या संकेतस्थळावरील प्राथमिक कार्यपद्धतीनुसार हिशोबपत्रकासोबत अपलोड करणे बंधनकारक असतानाही ती अपलोड केली जात नाही. तसेच धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या 31 ऑक्टोबर, 2013 रोजीच्या परिपत्रकानुसार हिशोबपत्रकावर तीन विश्वस्तांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यकता असतानाही त्या घेतल्या जात नाहीत. वेळेत हिशोबपत्रक दाखल करण्यास विलंब झाल्यास विलंबमाफी अर्ज स्वतंत्रपणे प्रत्येक वर्षाच्या हिशोबपत्रकासोबत अपलोड केला जात नसल्याचे धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात धर्मादाय उपायुक्त कार्यालयात हिशोबपत्रके दाखल करताना संबंधितांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच वरीलप्रमाणे अपुर्ण असलेली संकेतस्थळावर दाखल केलेली हिशोबपत्रके स्वीकारली जाणार नसल्याचे, धर्मादाय उपायुक्त, अहमदनगर श्रीमती यु.एस.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.