अनेक हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये मोफत साधे ,स्वच्छ पाणी देण्याऐवजी बाटलीबंद पाण्याची अप्रत्यक्षपणे केली जाते सक्ती!
शिर्डी (प्रतिनिधी)
सध्या बाटलीबंद पाण्याचा जमाना आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.इतर शहराप्रमाणे शिर्डीतही काही हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आपल्यासमोर बाटलीबंद पाणी दिले जाते. खरं तर टेबलवर एक साधं व स्वच्छ पाणी जग आणि ग्लास अशी सोय करणे आवश्यक आहे. तसा नियम आहे. परंतु अधिक पैसे मिळवण्यासाठी विनाकारण बाटली बंद पाणी घेण्याची शक्ती जणू अप्रत्यक्षपणे अश्या हॉटेलमध्ये केली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी येथे पाहायला मिळते. प्रत्येक हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये प्यायचं साधं पाणी ग्राहकांना देणे बंधनकारक आहे आणि ते दिले नाही तर त्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येते.
असे असतानाही अनेक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये साधे पाणी न देता बाटलीबंद पाणी टेबलवर ठेवून ते अप्रत्यक्षपणे ग्राहकांना खरेदी करण्याची जणू सक्तीच होत असल्याचे चित्र दिसत असून त्यावर औषध प्रशासन कारवाई करणार का? असा संवाल करत आठवड्यातून एकदा तरी अन्न व औषध प्रशासनाने येथे पथके पाठवून अशा हॉटेलवर छापे टाकावेत व ग्राहकांना बाटलीबंद पाणी विक्री करून होणारी लूट थांबवावी. अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.
सुरेश आरणे यांनी म्हटले आहे की, बाटलीबंद पाणी खरेदी केले तर पैसे जातात तसेच पाणी पिल्यानंतरही ही रिकामी बाटली कचरा ठरते. या रिकाम्या बाटली मुळे प्रदूषण वाढते. पुण्यामध्ये अशी सक्ती हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होऊ नये म्हणून गोखले इन्स्टिट्यूट मधील सेंटर ऑफ सस्टेनेबल या सेंटरकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक ची बाटली करताना रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्याचे लिंचिंग होते. प्लास्टिकचे केवळ दोन ते तीन वेळा रिसायकलिंग होते. नंतर ते इतके कमकुवत होते की त्याचे काहीच करता येत नाही. ते कचरा म्हणून पर्यावरणात राहते. त्याचे विघटन होत नाही. पण तुकडे होत राहतात .ते सगळीकडे माती नदी समुद्र यातून आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे हा सर्व प्रकार बंद व्हावा म्हणून साधे व स्वच्छ पाणी हॉटेल रेस्टॉरंट मधून जग मधून देणे महत्त्वाचे आहे. आता अनेक ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पाणी मोफत मिळते.
मग त्याचप्रमाणे हॉटेल रेस्टॉरंट मधून ते मिळावे. तसा अन्न औषध प्रशासनाचा नियम आहे .मात्र हा नियम डावलून पैशासाठी बाटलीबंद पाणी जाणीवपूर्वक विक्रीसाठी ठेवले जाते. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर बाहेर जात नाही. त्यामुळे प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये येथे स्वच्छ मोफत पिण्याचे पाणी सुद्धा मिळेल असा फलक लावावा. जर असे नसेल तर अशा हॉटेल रेस्टॉरंट वर कारवाई व्हावी अशी मागणी सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.