शिर्डी प्रतिनिधी
अवघ्या जगाला शांततेचा तथा श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांची ख्याती साता समुद्रा पलीकडे पोहचली आणि शिर्डीचं नावं एक अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जगामध्ये ओळखलं जात असताना शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार सामोरं आला तो म्हणजेच साईंच्या मूर्तीची झीज होत असल्याने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्राहलयाच्या तज्ञांनी शिर्डी साईसमाधी मंदिरातील मूर्तीची तब्बल तीन तास पाहणी केली आणि त्यानुसार संस्थान प्रशासनाला मूर्तीची झीज होत असून ती टाळण्यासाठी विशेष सूचना दिल्या.
बाबांच्या मूर्तीला सत्तर वर्ष पूर्ण झाले असताना त्या मूर्तीची झीज होत आहे याप्रकारची माहिती अनेक अनुभवी पुजाऱ्यांनी वारंवार प्रशासनाला दिली होती मात्र स्वार्थातून परमार्थ साधन्याच्या नादात अनेक अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण आता किती गंभीर आहे याची जाणीव प्रशासनाला झाली हे विशेष.
साईंच्या मूर्तीचा इतिहास हा मोठा रंजक आहे कारण सत्तर वर्षांपूर्वी त्याकाळातील विश्वस्त मंडळाने साईसमाधी मंदिरात बाबांची पूर्णाकृती मूर्ती बनवावी व समाधी मंदिरात स्थापन करावी असा निर्णय घेतला, ही मूर्ती बनविण्याचे काम मुंबई येथील प्रसिद्ध शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांना देण्यात आले, मुंबई येथे बंदरावर एक इटालियन मार्बलचा दगड बेवारस पडलेला होता आणि तो मार्बल संस्थांनने त्यावेळी लिलावात विकत घेतला आणि तालीम यांनी मूर्ती घडविण्यास सुरुवात केली
आणि त्यांना एका विशेष चमत्काराची अनुभूती आली कारण मूर्ती बनवत असताना बाबांचे नाक, डोळे कसे असावे यावर विचार करत असताना त्यांनी तयार केलेल्या मूर्तिजवळ क्षणभर साक्षात साईबाबा दिसले आणि त्यातूनच अजरामर अशा साईंच्या मूर्तीची निर्मिती झाली आणि शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर 1954 साली ही मूर्ती शिर्डीत आणण्यात आली आणि वाजत गाजत तथा विधिवत पूजा अर्चना करून साई समाधी मंदिरात स्थापन करण्यात आली. या सत्तर वर्षाच्या कालावधीत आजपावेतो साईंच्या मूर्तीला
अंदाजे पंचवीस हजार वेळा काकड आरतीच्या अगोदर दूध, दही तथा पाण्याने मंगलस्नान करण्याची परंपरा आजही अबाधित आहे. परंतु मंगळस्नान झाल्यावर टॉवेल तथा कपड्याने मूर्ती स्वच्छ करण्यात येते मात्र त्यामुळे मूर्तीवर काही परिणाम होईल याचा अंदाज कुणालाही नव्हता परंतु काही वर्षांपासून साईंच्या मूर्तीला काही ठिकाणी काळे डाग तसेच काही प्रमाणात झीज होत असल्याच पूजऱ्यांच्या लक्षात आलं
आणि त्यांनी ही बाब प्रशासनाला सांगितली तसेच या विषयी अनेक वर्तमानपत्रात बातम्याही आल्या होत्या त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि पुरातन खात्याशी संपर्क उशिरा का होईना केला.आता या मूर्तीची थ्रीडी स्कॅनिंग करण्याचा निर्णय वस्तू संग्रालयाचे मुख्य अधिकारी एस मुखर्जी यांच्या अध्यक्षखाली होणार असून पाच तज्ञांनी मूर्तीची पाहणी करून दीड महिन्यात निर्णय घेण्यात येईल असं प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितलं.
तर मंगलस्नानाच्यावेळी पाण्याचा, दुधाचा, दह्याचा व चंदनाचा वापर कमीत कमी करून मूर्ती स्वच्छ करताना टॉवेल तथा कपड्याने मूर्तीला घासू नये अशा या तज्ञ् कमिटीने प्रशासनाला सूचना केल्या तर भविष्यात हुबेहूब तीच मूर्ती बनविण्याची वेळ आली तर थ्रीडी स्कॅनिंग करून ते रेकॉर्ड जतन करून त्याच प्रकारची मूर्ती बनविण्याकामी मदत होईल असं या मुंबई येथील तज्ञ कमिटीने सांगितले.
शेवटी साईंच्या या मूर्तित एक वेगळं रूप आहे, एक वेगळी शक्ती आहे आणि एक वेगळाच चमत्कार आहे हे करोडो भाविकांनी अनुभवलं असताना आता या मूर्तिचे सौरक्षण तथा काळजी यापुढे साई संस्थान प्रशासन कशी घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.