विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणा-या श्री साईबाबांच्या शिर्डीत कार्तिक एकादशीनंतर धनगर समाजाचे तसेच संपूर्ण शिर्डी शहरवासीयांचे ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या तीन दिवसीय यात्रोत्सवास गुरुवारपासून मोठ्या भक्तिभावाने सुरवात झाली असून श्री बिरोबा महाराज यांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे.
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी शिर्डी शहराच्या पूर्वेला असलेल्या या जागृत बिरोबा देवाच्या तीन दिवसीय यात्रेला मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे.धनगरांचे आराध्य दैवत असणाऱ्या बिरोबा महाराज ( बिरुदेवाची ) महाराष्ट्रात सहा आणी कर्नाटकात सहा अशी बारा ठाणी आहे.बिरोबा या देवाला बिरदेव, विरभद्र,बिरूबा,बिरण्णा आदी नावाने ओळखलं जातं.आपल्या परिसरात शिर्डी, राहाता, कोपरगांव इ.ठिकाणी प्रसिद्ध बिरोबा महाराज यांची मंदिरे आहेत.
प्रामुख्याने बिरोबा महाराज हे धनगर समाज्याचे आराध्य दैवत मानले जाते.या सर्व ठाणकी असणाऱ्या बिरोबाचे पूजारी धनगर आहे.धनगरी ओव्या, धनगरी ढोल,कैताळ,वेत,कांबळा, धनगरी वाळुंग, धनगरी हेडम, धनगरी सिध्द परंपरा, धनगरी कैपत, ह्या सर्व कला परंपरा धनगरी समाज्याच्या असून या कला आणी संस्कृती आधुनिक काळातील बदलाने लोप पावत चालली आहे.
असो..यात्रेच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून भगत मंडळी सुर्योदयापुर्वी बिरोबा मंदीराची उंचच उंच काठी घेऊन नदीवर जातात.वाद्य ,पताका, ध्वज घेऊन गोदामाईच्या पवित्र पाण्यात आदरभावाने काठीला स्नान घातले जाते.अभ्यंग स्नान घातलेल्या काठीला शेंड्याला मोरपंखाचा गोंडा भगव्या कापडाने बांधण्यात येतो.सोबतच नव्या वस्त्रांची पट्टीने संपूर्ण काठी झाकून घेतली जाते.त्यानंतर सुवासिनी या सजवलेल्या काठीला हळदी कुंकू,अक्षदा वाहुन बरोबर असलेल्या एकमेकींना हळदी कुंकू लावून मांगल्याचा वसा घेतात.
आणी मग सुरू होते ती काठीची मिरवणूक. अबालवृध्दांसह बिरोबा महाराज की जय असा जयघोष करत सनी, डफ, ढोल,ताश्या, वाजवला जातो.विशेष म्हणजे हि काठीची मिरवणूक आणी सुर्यनारायणाचे आगमन एकाच वेळी होते.या मिरवणुकीत भगत मंडळी पारंपरिक नृत्य सादर करतात.बिरोबाला शेंदूर लावलेले मनमोहक रूप उजळून दिसते.अंगावर पांघरलेली मेंढीच्या लोकरीची घोंगडी देवाचे मानाचे वस्त्र आहे.
डोक्यावर तरुडाच्या पिवळ्या फुलांचे तोरण शोभून दिसते.तरुडाचा पाला बिरुदेवाला अधीक प्रिय आहे.त्याचप्रमाणे हिल्लळ ( विशीष्ट आकाराचा दिवा ) पेटवलेला असतो.देवाच्या मुख्य पूजेचे साहित्य म्हणजे पायरेखा ( लोखडी खिळे असलेल्या पादुका ) परंपरेने जतन केलेला वेत ( वेळूची काठी ) आदी गोष्टींचा समावेश असतो.
तर बिरोबा महाराजांच्या यात्रेत व्हईक हा प्रकार अनेकांना ठाऊक नाहिये.व्हईक म्हणतांना वेत लागतोच, जसा देवीला साठ तसा बिरोबाला वेत अशी परंपरा आहे. सायंकाळी व्हईक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पूजारी डफ वाजवत मंदिरात येतात.मंदीरासमोर पुढील वर्षाचे घडणाऱ्या घटनांचे वर्णन करत भविष्य सांगतात.आज आपण वैज्ञानिक प्रगती केली असल्याने या अद्भुत घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
त्यामुळे परंपरा म्हणून या गोष्टींकडे लोक बघतात.शिर्डी ग्रामस्थांची बनातील बिरोबा महाराज यांच्यावर अपार श्रद्धा आहे.या तीन दिवसीय यात्रोत्सवास राज्यातील हजारो भाविक हजेरी लावतात.मित्रांनो जागृत देवस्थान म्हणून या बिरोबा महाराजांची महती आता दूरदूरपर्यंत पोहचली आहे.