नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात पोस्ट लिहिली म्हणून नाशिकमधील डॉक्टरवर शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे.
डॉक्टरने जरांगेंच्याविरोधात लिहिलेल्या पोस्टमुळे संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करत त्यांच्या क्लिनिकमध्ये जात शाईफेक केलीये. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरच्या अंगावर शाई टाकत संभाजी ब्रिगेडकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट संबंधित डॉक्टरने केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला. नाशिकच्या सिडको भागातील डॉ. विजय गवळी असे शाईफेक करण्यात आलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही, तुम्ही आमच्यासाठी वडिलधारी आहात. आमच्या भावना तीव्र असून जगण्या-मरण्याची लढाई आम्ही लढत असल्याचं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना म्हटलं आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी क्लिनिकमध्ये घुसून डॉ. गवळी यांच्या अंगावर शाई फेक केली. त्यासोबतच डॉ. गवळी यांना संभजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागायला सांगितली. डॉक्टरांचा माफी मागतानाचा व्हिडीओ संभाजी ब्रिगेडने समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.