जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीला आंदोलन करण्यासाठी मराठा समर्थक घेऊन मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघाले आहेत. मुंबईतील मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असलेल्या जरांगेंनी शेवटची खेळी करत आंतरवालीमधूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे मुंबईत यावं लागत आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली. आंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सरकारवर हल्ला करताना त्यांचे डोळे पाणावले.
आंतरवाली सराटीमधील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची गरज भासली नसती. मी समाजात असो अथवा नसो माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी आता घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेवू नका. अशी भावनिक साद ही त्यांनी समाजाला घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत असून मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं. मी असेल नसेल एकजूट फुटू देऊ नका आणि एकी तशीच ठेवा, असंही ते यावेळी म्हणाले. ‘आम्ही आमचेही टप्पे पाडलेले असून माझ्या सोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण मुंबई जवळ गेल्यावर हा आकडा कोट्यावधी आंदोलकांचा होणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ही आता शेवटची लढाई आहे कुणीही घरी थांबू नका, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे.