शिर्डी( प्रतिनिधी )शिर्डी प्रमाणेच आता सावळीविहीर गावातही धूम स्टाईल गळ्यातले सोन्याचे दागिने ओरबुडून चोरी करण्याचे प्रकार वाढले असून नुकताच सावळीविहीर बुद्रुक येथे श्रीराम इंडस्ट्रीजच्या जवळील रस्त्यावरून जात असताना सीमा महेश आगलावे यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण धूम स्टाईल पळविले आहे. त्यामुळे परिसरातही आता महिलांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील सावळी विहीर फाट्याच्या पुढे श्रीराम इंडस्ट्रीजच्या जवळ राहत असणाऱ्या सीमा महेश आगलावे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,
दि.27/11/2024 रोजी दुपारी 03/30 वा.चे. सुमारास मी आमच्या शेजारी लग्नाला गेले होते. लग्न लावुन मी व माझ्याबरोबर जीजाबाई बाळु गात, सुनिता भगवान गात, बाळासाहेब शांताराम गात, मनिषा सुधाकर गडाख असे आम्ही घरी जात असतांना नगर मनमाड रोडवरून श्रीराम इंडस्ट्रीजच्या प्लॉट नंबर 5/11 च्या नजीक नाल्याजवळचा कच्चा रस्ता सावळीविहीर बु. यावरून जात असतांना आमच्या पाठीमागुन एक काळ्या रंगाची मोटारसायकल त्यावर दोन अनोळखी इसम त्यांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले,
सदर मोटारसायकल चालवणारा त्याच्या अंगात पांढ-या रंगाचे शर्ट व त्याच्या पाठीमागे बसलेल्या इसमाच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाचे बुट घातलेला होते. ते भरधाव वेगात पुढे गेले व पुढून वळुन परत आमच्या समोरून माझ्या जवळ येऊन गाडीवर बसलेल्या मागील इसमाने माझ्या गळ्यातील सोन्याचे पेंडल असलेला सोन्याचे तीन तोळ्याचे सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमंतीचे गंठण हे ओढुणतोडून चोरून घेऊन जात असतांना बाळासाहेब शांताराम गात यांनी पकडण्याचा प्रयत्न केला .परंतु ते पळुन गेले.
अशा आशयाची फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली असून शिर्डी पोलीस स्टेशनला या दोन अज्ञात भामट्यांविरोधात या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 648/ 2024 भादवी कलम 3(5) 309 ( चार) याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिरिष वमणे, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.