शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना या अधिनियमाप्रमाणे रजा व सुट्टया पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ लागू करण्याच्या सूचना साई संस्थानने बीव्हीजी इंडिया लिमिटेड पुणे तसेच इतर ठेकेदार कंपन्याना द्याव्यात. अशी मागणी श्री साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटना शिर्डी यांनी यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, शिर्डी येथील साई संस्थानमध्ये जवळपास २,००० कंत्राटी कर्मचारी विविध ठेकेदारांमार्फत गेली १५ ते २० वर्षांपासून सेवेत कार्यरत आहेत. राज्य शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ हा कायदा तयार करुन कंत्राटी कर्मचा-यांना भर पगारी रजा सुट्टया व इतर लाभ सुविधा दिलेल्या आहेत.
सदर कायद्याप्रमाणे रजा सुट्टया देणेबाबत संस्थानच्या ई-निविदेमध्ये नमुद केलेले आहे व मे. बी.व्ही.जी. इंडीया लि., पुणे, यांना दिलेल्या कार्यादेशामध्येही रजा-सुट्टया देणेबाबत स्पष्टपणे नमुद आहे. मात्र, त्यांनी निविदा व कार्यादेशाप्रमाणे रजा-सुट्टया दिलेल्या नाहीत. यापुर्वीही त्यांनी निविदेतील अटी-शर्तीचा भंग करुन रजा-सुट्टया दिलेल्या नव्हत्या, याच कारणामुळे संस्थानला ई-निविदा प्रक्रिया रद्द करुन फेर-निविदा प्रसिद्ध करणेस भाग पाडलेले होते.
मे. बी.व्ही.जी. इंडीया लि., पुणे, वारंवार संस्थानच्या ई-निविदेत भाग घेतात व निविदा घेतात. मात्र, प्रत्यक्ष संस्थानचा कार्यादेश स्विकारत नाहीत, तदनंतर संस्थानकडूनही त्यांचे कार्यादेशाला मुदतवाढ दिली जाते. यापुर्वीही त्यांनी ई-निविदेतील अटी-शर्तीचा भंग केलेला आहे, मात्र त्यांचेवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. तथापि, आता कार्यादेश न स्विकारुन पुन्हा मागील घटनेची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
त्यामुळे महोदय, सदर कायद्याची अंमलबाजवणी योग्यरित्या होत नसल्याने ठेकेदारांमार्फत कार्यरत २००० कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय यापुढे होऊ नये व संस्थानमधील कंत्राटी कर्मचा-यांना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ नुसार रजा/सुट्टया पुर्वलक्षी प्रभावाने तात्काळ लागू करण्याच्या सक्त सुचना मे. बी.व्ही. जी. इंडीया लि., पुणे, यांना संस्थानने द्याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर श्री साईबाबा संस्थान संघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र लक्ष्मण कोते, मार्गदर्शक रामराव रंभाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील रामदास कोते, उपाध्यक्ष दीपक शिवाजी तुरकणे, सचिव गोटीराम साहेबराव दाढे, सहसचिव दत्तात्रय देवकर, खजिनदार जयेश लाडवंशी, प्रसिद्धी प्रमुख सुनील मांजरेकर व
शरद बाबासाहेब मते आदि बरोबरच संघटनेचे कार्यकारी सदस्य किरण कांदळकर,महेश महाले, संदीप पवार ,निलेश गोंदकर ,अमोल राजूरकर ,गोरख सुरळे ,बाळासाहेब बढे ,ज्ञानदेव देवराम पाचपिंड,अशोक लोंढे, राजेश गिगना,रामनाथ थोरात ,गौतम पगारे, उमेश वाघ,राजेंद्र गोडे , एकनाथ गोंदकर, सुनीता लुटे, अशोक गायके, सुनिल ओहळ आदींची नावे आहेत.