शिर्डीसारख्या पवित्र भूमीमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाळूमाफियांची गुंडगिरी प्रचंड वाढली असून त्यांना राजकीय अभय मिळाले आहे. वाळूमाफीयांच्या गुंडगिरी आणि दहशती मुळे या परिसरातील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. या वाळूमाफियांना कायमचे गाडून टाकण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी या निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले आहे.
डॉ. राजेंद्र पिपाडा हे अपक्ष म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून त्यांना आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मंतदारांशी संपर्क साधतांना अनेक ठिकाणी या भागामध्ये गुंडगिरी करणाऱ्या वाळूतस्करांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक मतदारांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना विनंती केली आहे. आपण निवडून आल्याबरोबर या भागातील वाळूमाफियांना कायमचे नेस्तनाबूद करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.
मागील अनेक वर्षे राजकीय सत्ता एकाच कुटुंबाकडे असल्यामुळे त्यांनी अनेक वाळूमाफीया तयार करून आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांचा वापर केलेल्या आहे. गुंडगिरीच्या जोरावर त्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले आहे. या वाळूमाफीयांच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरक्षित झालेले आहे. ही प्रवृत्ती संपविणे ही काळाची गरज असून तिच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपण माझे हात बळकट करा असे डॉ. पिपाडा यांनी मतदारांना आवाहन केले आहे