आमचे काँग्रेसचे मित्र लोकसभेत संविधानाचा मुद्दा वारंवार मांडत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत काँग्रेसचं वर्तन संविधानानुसार नाही, असं केंद्रीय अवजड उद्योग तसंच पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. ते आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता,
त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच राहुल गांधी यांनी संसदेत भगवान शंकराचं चित्र दाखवलं ते चुकीचं होतं. अशा प्रकारे देवांचा राजकारणासाठी वापर करणे चुकीचं आहे, असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे.चेन्नईतील रुग्णालयात माझ्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यावेळी ‘मी’ साईबाबांना प्रार्थना केली. मी आता बरा झालोय.
त्यामुळं आज मी कुटुंबासह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दोन महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रीपद देऊन देशसेवा करण्याची संधी दिली आहे. दोन्ही खाती माझ्यासाठी आव्हानात्मक आहेत. मला देशातील सामान्य लोकांना रोजगार देण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही साईबाबांच्या चरणी केल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.
कुमारस्वामीचा संस्थानाकडून सत्कार : केंद्रीय अवजड उद्योग तसंच पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज कुटुंबासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कुमारस्वामी यांचं साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.